Dhananjay Munde l महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी राज्याचे माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. धनंजय मुंडे यांनी कृषी खात्याचा कार्यभार सांभाळताना मोठा घोटाळा केल्याचा दावा धस यांनी केला आहे.
कृषी खात्यातील अनियमितता :
सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. मुंडे यांनी कृषी मंत्री असताना विविध योजनांमध्ये अनियमितता दाखवून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला. या घोटाळ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), सक्तवसुली संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) मार्फत चौकशी करण्याची मागणी धस यांनी केली आहे.
आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास, मुंडे यांनी काही काळासाठी राजीनामा द्यावा आणि निर्दोष आढळल्यास पुन्हा मंत्रीपद स्वीकारावे, असे आव्हान धस यांनी दिले आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांना जाहीरपणे खुलासा करण्याचे किंवा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करण्याचे आव्हान दिले. तसेच, ‘भारतीय किसान संघाने’ दिलेल्या पत्राचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. वाल्मीक कराड यांनी मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले पत्र कृषी अधिकाऱ्यांसमोर फाडल्याचे धस म्हणाले.
Dhananjay Munde l नॅनो युरिया आणि डीएपी खरेदीत गैरव्यवहार :
धस यांनी केलेल्या आरोपांनुसार, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांच्या खरेदीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. ११२ रुपये दराने मिळणारा नॅनो युरिया २१२ रुपयांना खरेदी करण्यात आला, यात २१ कोटी २६ लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.
तसेच, ३०० रुपये प्रति ५०० मिली बॅग दराने मिळणारे नॅनो डीएपी ५९० रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे, ज्यात जवळपास ५६ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे धस यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र यंत्रमाग महामंडळाने (Maharashtra Handloom Corporation) देखील ७७.८५ कोटी रुपयांची गरज असल्याचे पत्र कृषी आयुक्तांना पाठवले आणि कृषी विभागाने तात्काळ निधी मंजूर केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. अवघ्या काही दिवसात कर्ज मंजुरीचे आरोप देखील करण्यात आले.