दहावीचा गणिताचा पेपर फुटला? झेरॉक्स दुकानात उत्तरपत्रिकांची विक्री सुरू

10th Exam Paper Leak

10th Exam Paper Leak l महाराष्ट्र राज्यात दहावीच्या बोर्ड परीक्षांसंदर्भात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात पेपरफुटीच्या घटना समोर येत असतानाच आता अमरावती जिल्ह्यातही दहावीच्या गणिताच्या पेपरफुटीची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी कारवाई करत झेरॉक्स दुकानातून गणिताच्या उत्तरपत्रिकांची झेरॉक्स काढताना काही लोकांना रंगेहात पकडले आहे.

झेरॉक्स दुकानातून उत्तरपत्रिकेचा पुरवठा? :

जालना आणि यवतमाळ जिल्ह्यातील पेपरफुटीनंतर आता अमरावती जिल्ह्यातही हा प्रकार समोर आला आहे. आज (७ मार्च) दहावीच्या गणिताच्या परीक्षेचा पेपर असताना अमरावतीतील चांदूरबाजार भागातील जिजामाता कनिष्ठ महाविद्यालय परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी झेरॉक्स दुकानावर छापा टाकला असता, तिथे काही विद्यार्थी उत्तरपत्रिकांची झेरॉक्स काढून नेत असल्याचे आढळले.

दहावीचा पेपर असल्याने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोलिसांनी गस्त वाढवली होती. त्याचदरम्यान जिजामाता शाळेसमोरील झेरॉक्स दुकानात काही मुले गणिताच्या उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी झेरॉक्स सेंटरमध्ये छापा टाकताच काही मुले पळून गेली, मात्र दुकानाच्या आत एक व्यक्ती झेरॉक्स मशिनवर पेपरची छपाई करताना आढळला. चौकशीत ही उत्तरपत्रिका दहावीच्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले.

यापूर्वीही जालना-यवतमाळमध्ये पेपरफुटीचा प्रकार :

हे काही पहिले प्रकरण नाही. यापूर्वीही जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात दहावीच्या पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आदर्श विद्यालय कोठारी केंद्रावर २२१ विद्यार्थ्यांसाठी २२५ प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्या होत्या. मात्र, उर्वरित चार प्रश्नपत्रिकांपैकी एक चोळामोळा झालेली स्थितीत आढळून आली. याच प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हायरल झाल्याचे उघड झाले होते.

दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असल्या, तरीही पेपरफुटीचे सत्र थांबताना दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातही मराठी विषयाचा पेपर परीक्षा सुरू असतानाच व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी मुख्याध्यापक आणि केंद्र संचालक श्याम तासके यांच्यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पेपरफुटीच्या घटनांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. प्रशासनाने अशा घटनांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. पोलिसांकडून या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास केला जात आहे.

News Title: 10th Exam Paper Leak in Maharashtra

 

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .