Neha Malik Robbery | मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नेहा मलिक हिच्या घरी चोरी झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नेहाच्या मुंबई येथील राहत्या घरी तब्बल ३४ लाख रुपयांचे मौल्यवान दागिने चोरीला गेले असून, या प्रकरणी तिच्या मोलकरीणीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
ही चोरी शुक्रवारी घडली असून नेहाची आई मंजू मलिक या प्रार्थनेसाठी गुरुद्वारामध्ये गेल्या असताना, घरात मोलकरीण शहनाज शेख एकटीच होती. शनिवारी ती कामावर परतली नाही आणि वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने मंजू यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी घरातील कपाटाची तपासणी केली आणि दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास सुरू :
मंजू मलिक यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३८० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सध्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, आरोपी शहनाज शेख हिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मंजू यांनी पोलिसांना सांगितले की, त्या अनेकदा आपल्या बेडरुममधील लाकडी ड्रॉवरमध्ये मोलकरीणीसमोरच दागिने ठेवत असत. चोरी झाल्यानंतर शहनाजने कामावर येणे थांबवले आणि तिचा फोनही बंद आहे.
Neha Malik Robbery | नेहा मलिक: सोशल मीडियावर लोकप्रिय चेहरा :
नेहा मलिक ही पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा असून, तिचे इन्स्टाग्रामवर चार दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती तिच्या फॅशन, लाईफस्टाईल आणि ग्लॅमरस कंटेंटसाठी ओळखली जाते.
तिने विविध टीव्ही शोमध्येही सहभाग घेतला असून सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. अशा वेळी तिच्या घरी झालेली चोरी ही तिच्या चाहत्यांसाठीही धक्कादायक घटना ठरली आहे.