९० तास काम?, आठवड्याचे तास वाढवण्याबाबत सरकारचं स्पष्टीकरण

Working Hours l देशभरात सध्या आठवड्यात कामाचे तास किती असावेत, यावरून वाद सुरू आहे. काही आघाडीच्या उद्योगपतींनी आठवड्यातील तासांची कमाल मर्यादा वाढवून ७० ते ९० तास करावी, असे सुचविले होते. यावर विविध स्तरांमधून टीकाही झाली होती. परंतु, केंद्र सरकारने अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावावर सरकार विचार करीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे हे स्पष्टीकरण दिले आहे.

कुणामुळे सुरू झाला वाद? :

हा वाद लार्सन अँड टुब्रो लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी एस. एन. सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यानंतर सुरु झाला. त्यात त्यांनी आठवड्याला ९० तास काम करावे असे म्हटले होते. याला इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला ७० तास काम केले पाहिजे असे सांगत एकप्रकारे समर्थनच दिले होते.

Working Hours l आरोग्य संघटनेचे म्हणणे काय? :

जागतिक आरोग्य संघटना व आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांच्या संयुक्त अभ्यासुनसार, कामाच्या वाढीव तासांमुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो तसेच मानसिक आजारांचा धोका वाढतो. आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे १२ अब्ज कामाचे दिवस केवळ नैराश्य आणि चिंतेमुळे वाया जातात. यातून दिवसाला एक ट्रिलियन डॉलरचा अर्थात ७ हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते.

आर्थिक पाहणी अहवालातही विरोध :

नुकत्याच सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये नमूद केले आहे की आठवड्याला ६० तासांपेक्षा अधिक काम केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. जे लोक रोज १२ तास किंवा अधिक वेळ कार्यालयात घालवतात त्यांना मानसिक तणावाचा जास्त धोका असतो, असेही यात म्हटले होते.

करंदलाजे यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, कामगार विषय हा केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीत येतो. कामगार कायद्यांची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकारे त्यांच्या अधिकारक्षेत्रात करीत असतात. बहुतांश उद्योग आणि कॉर्पोरेट कंपन्या या कायद्यांनुसार चालतात.

काय आहे सद्यस्थिती? :

सध्या कामाच्या अटी, कामाचे तास आणि ओव्हरटाइम आदींबाबत नियम फॅक्टरीज ॲक्ट १९४८ तसेच विविध राज्यांच्या शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्टमधील तरतुदींनुसार केलेले आहेत.

थोडक्यात, केंद्र सरकारने आठवड्यातील कामाचे तास वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट, जास्त तास काम केल्याने आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांबाबत आरोग्य संघटना आणि आर्थिक पाहणी अहवालातही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

News Title: 90 Hours of Work? Why? Government Clarifies: No Proposal to Increase Weekly Working Hours