माढ्यात शरद पवार खेळणार मराठा कार्ड?, अभिजीत पाटलांनी घेतली जरांगेंची भेट

Abhijeet Patil | लोकसभेत माढा (Madha) मतदारसंघात चांगलंच घमासान पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीवरून येथे शेवटपर्यंत उत्सुकता दिसून आली. माढ्याच्या उमेदवारीसाठी सुरू असलेला संघर्ष अखेर संपला आहे. शरद पवारांनी माढ्यात धक्कातंत्र देत यंदा साखर कारखानदार अभिजीत पाटील (Abhijit patil) यांना विधानसभेचं तिकीट दिलंय. येथे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे इच्छुक होते. मात्र, अभिजीत पाटलांनी उमेदवारी मिळवण्यात मात केल्याचं दिसून आलं.

राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याहस्ते अभिजीत पाटील यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला आहे. यानंतर अभिजीत पाटील यांनी तातडीने अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यामुळे माढ्यात आता जरांगे फॅक्टर चालणार का?, याबाबत चर्चा रंगत आहेत.

अभिजीत पाटील माढ्यातून लढणार

अभिजीत पाटील आणि जरांगे पाटील यांचे संबंध खूप चांगले असून अभिजीत पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक लढवणार असल्याचं सांगितल्याचं कळतंय. लोकसभेत जरांगे इफेक्टमुळे माढा विधानसभेतून महायुतीच्या उमेदवारला 55 हजार मतांची पिछाडी मिळाली होती. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी सावध होत अजितदादांची साथ सोडत आपण शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार किंवा अपक्ष लढवू, अशी भूमिका घेतली होती.

उमेदवारीसाठी त्यांनी गेले आठ दिवस शरद पवारांकडे प्रयत्न केले. मात्र, शरद पवारांनी उमेदवारीची माळ ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील  (Abhijeet Patil)यांच्या गळ्यात घातली. त्यातच अभिजीत पाटील यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने बबनदादा शिंदे यांच्या गटात आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अभिजीत पाटील मनोज जरांगे भेट

महायुतीकडून अद्याप येथे उमेदवार जाहीर झाला नाही. ही जागा अजित पवार गटात असली तरी  अजित पवार गटाकडे सक्षम उमेदवार अजून तरी दिसून येत नाहीये. त्यामुळे या जागेवर शिंदे गटाने देखील दावा केलाय. शिंदे यांच्या गटाकडून ओबीसी नेते शिवाजी कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. आता महायुतीकडून येथे कुणाला उमेदवारी मिळणार, याकडेही सर्वांचं लक्ष राहील.

अभिजीत पाटील यांनी जरांगे यांची भेट घेऊन मोठी खेळी खेळण्यासाठी एक पाऊल टाकलं आहे. मात्र, माढ्यातून जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय धनाजी साखळकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. आता जरांगे माढ्याच्या बाबतीत काय निर्णय घेणार ते येत्या 30 तारखेला दिसून येईल. तसेच, जरांगे यांची भेट घेतल्याने माढा मतदारसंघातील मराठा मतदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांना कौल देणार का?, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

News Title – Abhijeet Patil met manoj jarange

महत्त्वाच्या बातम्या-

सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीच्या काळात बदलणार अनेक नियम

तिकीट न मिळाल्याने नाराजी, मुंबईत महायुतीच्या तीन जागांवर बंडखोरी

आत्महत्येची भाषा करणारे आमदार वनगा कालपासून बेपत्ता, मुख्यमंत्र्यांचा तातडीने फोन

मनसेची सातवी यादी जाहीर, पारनेरमध्ये लंकेंविरोधातही दिला उमेदवार

अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर, महायुतीत NCP ला किती जागा मिळाल्या?