Abhijit Pawar l ठाण्यातील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटावर गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपल्याला अजित पवार गटात जाण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाडांना अडकवण्याचा डाव? :
अभिजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्यावर अजित पवार गटात सामील होण्यासाठी प्रचंड दबाव होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडचणीत आणण्यासाठीच आपला वापर केला जाणार होता, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. “आव्हाड यांचा फोन आला नसता, तर मी आत्महत्या केली असती,” असेही ते म्हणाले.
दोन दिवसांपूर्वीच अभिजित पवार यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला होता. मात्र, अवघ्या दोन दिवसांत त्यांनी घरवापसी करत, पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून, पुन्हा दोन वर्षे तुरुंगात पाठवण्याचे षडयंत्र रचले जात होते, असा आरोप त्यांनी केला. मित्रांना पोलिसांकडून धमक्या दिल्या जात होत्या, तसेच ईडीचीही (ED) धमकी दिली जात होती, असे पवार यांनी सांगितले. नजीब मुल्ला (Najeeb Mulla) यांच्या मार्फत धमक्या मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Abhijit Pawar l मानसिक दबावाखाली प्रवेश :
आपल्यावर प्रचंड मानसिक दबाव होता आणि जितेंद्र आव्हाड यांना न सांगता, केवळ दबावापोटी आपण अजित पवार गटात गेलो होतो, असे अभिजित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, आव्हाड यांना अडचणीत आणण्यासाठी आपला वापर होणार, हे लक्षात येताच, आपण पुन्हा त्यांच्याकडे परत आलो, असे पवार म्हणाले. आपल्या आई आणि पत्नीलाही घाबरवण्याचा प्रयत्न झाला, असे त्यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी, कोणालाही त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडू नका, अशी विनंती केली. जमील शेखच्या दोन मुली आणि पत्नीच्या दुःखाचा उल्लेख करत, त्यांनी नजीब मुल्ला यांच्यावर नाव न घेता टीका केली. अभिजित पवार यांनी, आव्हाड यांनी आपल्याला आपलेसे केले नाही, तरीसुद्धा आपण त्यांना सोडणार नसल्याचे सांगितले. नजीब मुल्ला यांनी अभिजित पवार यांना भराडी देवीसमोर सत्य सांगण्याचे आव्हान दिले आहे.
“मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत