Ladki Bahin Yojana l राज्यात महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेषतः ३० लाख महिलांना अपात्र ठरवून त्यांचा लाभ बंद होणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मात्र, या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी खुलासा करत अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.
योजनेबाबत कोणते बदल करण्यात आले? :
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही जुलै २०२४ पासून सुरू झाली असून, या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१५०० चा निधी थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. लाभार्थ्यांची पडताळणी ही प्राप्तिकर विभाग, परिवहन विभाग आणि राज्य सरकारच्या इतर योजनांच्या मदतीने केली जात आहे. या प्रक्रियेमुळे काही महिलांना अपात्र ठरवले जाईल, असे सांगितले जात होते.
Ladki Bahin Yojana l महिलांच्या खात्यातून निधी परत जाणार नाही – आदिती तटकरे :
या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, सरकारने कोणत्याही महिलेच्या खात्यातून पैसे परत घेतलेले नाहीत आणि तसे करण्याचा कोणताही विचार नाही. त्याही पुढे म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”
आदिती तटकरे यांनी आणखी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली :
काही महिला स्वयंस्फूर्तीने लाभ सोडण्यासंदर्भात अर्ज दाखल करत आहेत. अंगणवाडी सेविका, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे या अर्जांची नोंद केली जात आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात देखील अनेक महिलांनी आपली पात्रता नव्हती, असे सांगत योजना सोडली आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे कोणत्याही महिलेला जबरदस्तीने लाभ नाकारला जाणार नाही.
मंत्र्यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, “काही माध्यमांमध्ये ३० लाख, ३५ लाख, ४० लाख आणि उद्या एक कोटी महिलांना अपात्र ठरवले जाईल, अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, ही माहिती चुकीची आहे.” योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही नवीन नियम लागू केले गेले नाहीत.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिला लाभार्थींना कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही आणि लाभ नियमितपणे पात्र महिलांना मिळत आहे.
News Title : Aditi tatkare statement on ladaki bahin yojana