Artificial Intelligence l माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) वाढत्या प्रभावावर भाष्य करताना, एआय (AI) मानवी न्यायाची जागा घेऊ शकत नाही, असे मत व्यक्त केले. मुंबईतील (Mumbai) वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (Welingkar Institute of Management) येथे आयोजित एका परिषदेत ते बोलत होते.
तंत्रज्ञानाचा वापर आणि न्यायिक समतोल :
न्यायप्रक्रिया सुलभ करण्यासाठी आभासी न्यायालयांचा उपयोग होत असला, तरी त्यामुळे निष्पक्ष न्यायनिवाड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर करताना सर्जनशीलता आणि न्यायिक प्रामाणिकता यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “उदयोन्मुख डिजिटल वस्तुस्थिती लक्षात घेऊन निःस्पृह, परिवर्तनशील आणि द्रष्ट्या सुशासनासाठी अनुरूप कायदे तयार करणे गरजेचे आहे,” असेही ते म्हणाले.
एआयमुळे व्यवस्थापनात बदल होत असून कायदेशीर प्रक्रिया जलद आणि अधिक कार्यक्षम होत आहे. मात्र, अलीकडेच एका वकिलाला एआय-निर्मित बनावट खटल्यांचे संदर्भ वापरल्याप्रकरणी शिक्षा झाल्याचे उदाहरण देत, तंत्रज्ञान मदत करू शकते, पण मानवाची जागा घेऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
Artificial Intelligence l कायदे आणि सामाजिक समानता :
पुण्यात (Pune) महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा उल्लेख करत चंद्रचूड यांनी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे करून उपयोग नाही, तर कायद्यांची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
“अनुसूचित जाती आणि जमाती, महिला, अल्पसंख्याक यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शिक्षण, रोजगार आणि नेतृत्वाच्या बाबतीत ते वंचित राहतात. प्रगती साधण्यासाठी सर्वांना समान संधी मिळणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
News title : AI Cannot Replace Human Judgement: Ex-CJI Chandrachud