Top News पुणे महाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अँटिजेन चाचणी किटसाठी निधी उपलब्ध करुन देणार, अजितदादांचा शब्द

पुणे  | जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी अँटिजेन किट घेण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश देत ५० हजार अँटिजेन किट घेण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच ‘कोरोना’ रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

‘कोविड-१९’ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पडली.

कोरोना रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने अधिकाधिक रुग्णालयांचा या योजनेत समावेश होण्यासाठी कार्यवाही करावी. हवेली, खेड, मावळ, शिरुर, पुरंदर अशा रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या भागाबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय अधिकारी व आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. ग्रामीण भागातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे सांगून ‘जम्बो’ रुग्णालयाचे काम लवकरच पूर्ण होणार असून यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी मदत होईल. नागरिकांनी देखील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्यायला हवी, असे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी आषाढी वारी, बकरी ईद, दहिहंडी असे सर्व सण-समारंभ मर्यादित उपस्थितीत साजरे करण्यात आले असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षीचा गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्याबरोबरच गणेश विसर्जन घरगुती स्वरुपात करायला हवे. लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक गणेश मंडळांना विश्वासात घेवून याबाबत जनजागृती करावी. उद्योजकांनी कारखाने सुरु ठेवताना कोरोना विषयी घ्यावयाच्या दक्षतेबाबत तसेच कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी उद्योजकांच्या सोबत बैठक घेवून आवश्यक त्या सूचना कराव्यात.

जिल्ह्यात पूर परिस्थिती व ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी जलदगतीने निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगून पुणे-नाशिक रेल्वे बाबतचा विषयही लवकरच मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील बांधकाम मजुरांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची नोंदणी करुन घेण्यासाठी प्रयत्न करावा, असे सांगून जिल्ह्यातील विविध विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा केली.

महत्त्वाच्या बातम्या-

पार्थ प्रकरणावर रोहित पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…..

महाविकास आघाडी सरकारला झटका; ग्रामपंचायत प्रशासकाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय

‘महाराष्ट्र पोलीस’ आम्हाला तुमचा अभिमान आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या