Ajit Pawar | बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अडचणीत सापडले आहेत. या हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा मुंडे यांच्या अत्यंत जवळचा आहे. त्यामुळे मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे. तसंच, त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. या मागणीवरच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूचक वक्तव्य करत राजीनाम्याचा निर्णय मुंडे यांच्यावरच सोडला आहे.
“राजीनाम्याचा निर्णय मुंडे यांच्यावरच”
अजित पवार यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पूर्वी अनेक प्रकरणांमध्ये आरोप झाल्यानंतर स्वतःसह अनेक नेत्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता. त्यांनी २०१० मध्ये जलसंपदा मंत्री असताना झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर स्वतः राजीनामा दिल्याचेही नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांनी केवळ रेल्वे अपघात झाल्याने राजीनामा दिला होता, त्यानंतर अनेक अपघात झाले, पण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. याचा विचार करायला हवा.” मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना त्यांनी थेट भूमिका न घेता, “मुंडे साहेब महाराष्ट्रात काय चालले आहे हे पाहत आहेत, त्यांनाच विचारा,” असे म्हणत विषय टाळला.
मुंडे यांच्या संभाव्य राजीनाम्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत गंभीर असून, याप्रकरणी एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयीन चौकशीसाठी अनेक यंत्रणा नेमण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोषींवर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन दिले आहे. (Ajit Pawar)
याचवेळी सुरेश धस (Suresh Dhas) आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता, अजित पवार यांनी त्यावर थेट उत्तर न देता, “या दोघांनाच त्याची माहिती आहे,” असे म्हटले.
छगन भुजबळ अनुपस्थित, पक्षांतर्गत हालचालींना वेग
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाशिक दौऱ्यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) अनुपस्थित राहिले. यामुळे पक्षांतर्गत हालचालींबाबत चर्चेला उधाण आले आहे. मात्र, पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी इथे न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी आलो आहे. कोणाला निमंत्रण द्यायचे हे मी ठरवत नाही.”
याचवेळी, त्यांनी नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प महत्त्वाचा असून, मार्गात काही बदल करण्याच्या सूचना असल्याचे सांगितले. तसेच, लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) पुढील हप्त्यांचे वाटप लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
News Title: Ajit Pawar Statement Raises Pressure on Dhananjay Munde