NCP | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर पक्षात मोठी राजकीय घडामोड झाली होती. पवार कुटुंबातही मतभेद निर्माण झाले होते. काही सदस्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, त्यामुळे या संघर्षाला आणखी तीव्रता मिळाली. मात्र, गेल्या काही काळात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात भेटी झाल्या, तसेच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गटांमधील अंतर काहीसं कमी झाल्याचं बोललं जात आहे.
तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेत राष्ट्रवादीचे सर्व गट एकत्र
शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी (Tukaram Dhuvalli) यांचे अलीकडेच निधन झाले. ते राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांशी अत्यंत जिव्हाळ्याने जोडले गेले होते. त्यांच्या जाण्याने दोन्ही गटांमधील नेत्यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या स्मरणार्थ उद्या वाई. बी. सेंटर येथे संध्याकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.
या शोकसभेला शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रफुल्ल पटेल (Praful Patel), सुनील तटकरे (Sunil Tatkare), दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), छगन भुजबळ, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही गटातील नेते एका व्यासपीठावर एकत्र येणार असल्याने, हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा क्षण असणार आहे. यामुळे पक्षाच्या भविष्यातील राजकीय समीकरणांबद्दल नवे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
तुकाराम धुवाळी – पवार कुटुंबाचे विश्वासू सहकारी
तुकाराम धुवाळी हे शरद पवारांचे अत्यंत जुने सहकारी आणि विश्वासू स्वीय सहायक होते. शरद पवार गेल्या 60 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत, तर धुवाळी यांनी 1977 पासून 53 वर्षं त्यांना साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत ते शरद पवारांच्या सोबत राहिले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि सचोटीमुळे ते पवार कुटुंबातील अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती बनले होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या शोकसभेत दोन्ही गट एकत्र येणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल नवी चर्चा सुरू झाली आहे. हा एकत्रित कार्यक्रम केवळ श्रद्धांजलीपर्यंत मर्यादित राहणार की यामधून काही मोठे राजकीय संकेत मिळतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (NCP)
Title : All NCP Leaders to Unite on One Stage for the First Time
“मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो”; अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत