सर्वसंचारी गिरीश बापट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुळातच लोकांप्रती कणव आणि सामाजिक कार्याची आवड असल्याने, घरातून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तुत्वाने गिरीशभाऊ राजकारणात पुढे आले. मोठी पदे मिळवूनही अगदी शेवटपर्यंत त्यांनी साधेपणा जपला. टेल्को कंपनीत कर्मचारी ते लोकसभेचे खासदार तसेच अंदाज समितीचा अध्यक्षपद भूषवूनही त्यांच्या स्वभावात कधीच फरक पडला नाही. राजकीय क्षेत्रात वावरताना ते स्वत:ला एक ‘ सामान्य कार्यकर्ता ‘ मानत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना सर्वसामान्यांसाठी आपले काम कसे उपयुक्त ठरेल, याचा अतिशय कटाक्षाने ते विचार करायचे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नव्याने काहीतरी शिकायला मिळायचे. थोडक्यात, त्यांचे ‘ गिरीश बापट स्कूल ऑफ पॉलिटिक्स ‘ असं वर्णन करता येईल. ते म्हणजे अनुभव अन् ज्ञानाने समृद्ध अशी शाळा, महाविद्यालय किंवा त्याही पुढे जाऊन चालते-फिरते ‘राजकीय विद्यापीठ’ होते असाही त्यांचा उल्लेख केल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, इतकी त्यांची राजकीय संपदा अफाट होती. प्रकृती खालावत असताना, हात जागचा उचलणेही जड जात असताना काही महत्वपूर्ण पत्रांवर त्यांच्या असणाऱ्या सह्या यावरूनच त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा, तळमळ, समर्पण लक्षात येते.

विधानमंडळात काम करताना तेथील त्यांचा इतर नेत्यांसमवेत असणारा वावर, कर्मचारी, सामान्य नागरिकांशी मैत्रीपूर्ण संवाद, पत्रकारांशी संभाषण करताना असणारी हातोटी हे मी जवळून अनुभवले. यात कुठेही प्रयत्नपूर्वक संवाद नसल्याने, त्यांच्या वागण्या- बोलण्यात नैसर्गिक स्निग्धता असे. मी किंवा माझ्यासारखे पत्रकार पुण्यातून विधिमंडळाच्या कामकाजाचे वृत्तांकन करायला जेव्हा जायचो, तेव्हा त्यांच्याच खोलीत राहायचो. त्यांच्यासोबत राहत असताना ते स्वत: स्वयंपाक करून आम्हाला खायला द्यायचे. मीही त्यांच्यासोबत स्वयंपाक करत असे. आमच्यासारख्या व्यक्ती असोत की, वरिष्ठ पत्रकार अभय देशपांडे, रविकिरण देशमुख, अतुल कुलकर्णी, तत्कालीन उपमुख्यमंत्री, गृहमंत्री पदी काम करणारे दिवंगत नेते आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांच्यासारखे दिग्गज नेते असोत सर्वच जण एकत्र येऊन भाऊंच्या समवेत जेवायला बसायचे. यानंतर गप्पा व्हायच्या. राजकीय असो किंवा इतर कोणतेही सामाजिक विषय असोत अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह तेथे व्हायचा. ते दिवसच वेगळे होते. मॅजेस्टिक आमदार निवासाच्या शेजारी एक चायनीज रेस्टॉरंट आहे. तिथं ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, विलासकाका उंडाळकर यांच्यासह काही नेते मंडळी गप्पा मारायला भेटायचे. एक दिवशी भाऊ मला म्हणाले, ‘ सुनील,आपल्याला आज बाहेर जेवायला जायचं आहे आणि गणपतराव आबांकडे गप्पा मारायच्या आहेत.’ वांग्याचे भरीत, भात असे आगळेवेगळे जेवण त्या चायनीज हॉटेलमध्ये घेत आम्ही गणपतराव आबा आणि उंडाळकरांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या.

राज्यातल्या दुष्काळाचा प्रश्न, शेतकऱ्यांचे विषय अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्या. यातून लोकांकडून आपण काय शिकून घेऊ शकतो? आपण काय करू शकतो हा शिकण्याचा आणि देण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. या सर्व गोष्टी आज आठवल्या की, मन अस्वस्थ होते. कारण असे अभ्यासू, सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आता क्वचितच पाहायला मिळते. पुण्याचे प्रश्न असो, किंवा महाराष्ट्राचे, ते सोडवण्यासाठीची त्यांची तळमळ मी अनेकदा जवळून पहिली. विधिमंडळात जायचे तर शाळेला जातोय तसं जायचं. जोवर विधानमंडळाचं कामकाज संपत नाही तोवर बाहेर पडायचं नाही. असा त्यांचा नियम होता. जनतेने आपल्याला निवडून दिले आहे. विधानसभेत प्रत्येक क्षण जनतेच्या प्रश्नासाठी खर्च झाला पाहिजे हा त्यांचा परिपाठ होता. त्यातूनच अधिवेशनातून परत पुण्यात आल्यावर प्रत्येक वेळी पत्रकार परिषद घेऊन आपण अधिवेशनात केलेल्या कामाची माहिती लोकांना देणे हा त्यांचा प्रघात कायम राहिला. दरवर्षी आपल्या कामांचा अहवाल तयार करून लोकांपुढे तो सादर करण्याची प्रथाही तशीच कायम होती.

लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक आणि तिच्यासाठी जबाबदार आहे, ही त्यांची मानसिकता होती. प्रत्येकाचा विषय लिहून घेणे, कामाचे टिप्पण घेणे अशी त्यांची वैशिष्टपूर्ण कामाची शैली होती. यासाठी त्यांनी स्वत:ची डायरी तयार केली होती. खूप लोकांनी त्यांची ही शैली आत्मसात केली. मा. खासदार श्रीनिवासजी पाटील हे जिल्हाधिकारी असताना त्यांनी त्यांच्याकडे अशी डायरी पहिली होती. यामध्ये ते कार्यालयात, प्रवासात नव्हे तर अगदी निवासस्थानातून केलेले काम या सर्वांची वेळेसह इत्यंभूत नोंद ठेवायचे. यात ते नागरिकांचे प्रश्न लिहून घ्यायचे. ते प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा काय आराखडा तयार करायचे, अशा अनेक बाबी ते डायरीमध्ये बारकाईने टिपायचे. त्यांचे हे अनेक गुणविशेष अनुकरणीय होते. सर्व पक्षांच्या, वेगवेगळ्या गटांच्या, वेगवेगळ्या समाजाच्या, समाज घटकांबद्दल त्यांना माहिती असायची. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, दरवर्षी १३ एप्रिलला मध्यरात्री पुणे स्टेशनजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रकाश आंबेडकर साहेबांच्या कार्यकर्त्या,ॲड. वैशालीताई चांदणे या डॅा. बाबासाहेब यांच्या वरील गाण्यांचा कार्यक्रम घेत असतात.

बापट साहेब त्या कार्यक्रमाला न चुकता अनेक वर्षे जायचे. कसब्यातल्या छोट्या छोट्या गल्यांमध्ये वेगवेगळ्या समाजाच्या घटकांमधल्या प्रत्येकाशी त्यांचे कौटुंबिक व जिव्हाळाचे संबंध होते. त्यांचे प्रश्न त्यांना माहिती होते. अगदी पालकमंत्री असतानाही शेजारून रिक्षाचालक चालला असला तरी, ते लाल दिव्याच्या गाडीची काच खाली करून त्याच्याशी गप्पा मारायचे, लहान मुले चालली असतील तर त्यांच्याशी गप्पा मारायचे मग पुढे जायचे. पालकमंत्री असताना एकदा महापालिकेच्या दारात काही नागरिकांनी उपोषण केले होते. त्यांची काय समस्या आहे हे स्वत: त्यांच्याजवळ जाऊन, त्यांच्या सोबत खाली बसून त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर याविषयी आयुक्तांशी बोलून चर्चा केली. व त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जातीने लक्ष घातले. मी दिल्लीत २००८ मध्ये संसदेत वार्तांकनाचे काम केले असल्यामुळे दिल्लीत राहणे म्हणजे काय याचा मला अनुभव आहे. महाराष्ट्रात जो खूप सामाजिक काम करतो तो माणूस दिल्लीत सहसा रुळत नाही, असा मला अनुभव होता. कारण दिल्लीत महाराष्ट्रासारखा सामाजिक वावर नसतो. कार्यक्रम नसतात, लोकांना फार भेटता येत नाही, कंटाळा येतो. म्हणून मी ‘भाऊंकडे ‘तुम्हाला दिल्लीत कंटाळा येईल. तुम्ही महाराष्ट्रात थांबलं पाहिजे.’ असा आग्रह धरला. मलाही असे वाटले होते म्हणून मी दिल्ली सोडून आलो. मला दिल्लीचा कंटाळा आला, असंही त्यांना मी सांगितले. मात्र यास नकार देत, ते म्हणाले ‘ महापालिकेचे कामकाज पहिले, राज्यातीलही महत्वाच्या पदांवर काम केले. पालकमंत्री म्हणूनही काम करायची संधी लाभली. आता खासदार होऊन नगरसेवक ते खासदार असा प्रवास करण्याची माझी इच्छा आहे. यामुळे लोकांसाठी शेवटच्या पदापर्यंत काम करता आलं, याचं मला समाधान वाटेल.’ असे ते म्हणाले. त्यांच्या मानस ऐकून मलाही आनंद वाटला. त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी मी महापालिकेच्या आयुक्तांसोबत भाऊंच्या घरी बसलो होतो. त्यावेळी आयुक्तांनीही भाऊंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कोरोनाच्या काळात बापट साहेबांसोबत आम्ही खूप काम केले. त्यांनी लोकांसाठी ओंकारेश्वर मंदिरात खूप मोठा भटारखाना सुरू केला. महापलिका आयुक्तांशी काय विषय घेऊन बोलायचे आहे, त्यासंदर्भात त्यांनी मुद्दे काढले. ‘नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नसतील तर एनएसएस आणि एनसीसीची मुले बोलवा. त्यांच्याकडे काम सोपवा. लोक नियमांचे कसे पालन करतील याची दक्षता घ्या. यामध्ये सहभागी मुलांचे कौतुक करा,’ असे सुचविले. यावर आयुक्तांनी त्यांना प्रशस्तीपत्र देत असल्याचे सांगितल्यावर मात्र भाऊंनी त्या मुलांना ड्रेस वगैरे देणे योग्य ठरेल, असे सुचवले. इतका बारकाईने काम करणारा एखादाच विरळ माणूस असतो. असे सांगत आयुक्तांनी बापट साहेब यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण अधोरेखित केले.

बापट साहेब यांनी आपल्या ५० वर्षाच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत जे काही लोक, पक्ष, संघटना, समाज वेगवेगळे घटक जोडले हा त्यांचा स्वभावगुण शिकण्यासारखा आहे. याबाबत त्यांची एक वेगळी हातोटी होती. प्रत्येकजण आपापले व्यक्तिमत्व घेऊन काम करत असतो. त्यांनी ज्या पद्धतीने काम केले, सगळा डोलारा उभा केला, राजकीय, सामाजिक परिघात एक वेगळी सांगड घातली, अभावानेच हे लोकांना जमण्यासारखे आहे. आता इतर पक्षाचे नेते माझ्याबरोबर गप्पा मारतात, तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते की, लोकांना बापट साहेबांच्या कामाचा आवाका, लोकसंग्रह काही झालं तरी जिंकून येण्याची ताकद त्यात त्यांची हातोटी हे त्यांचे सर्व स्वभाव विशेष अनुकरण करण्याची इच्छा दर्शवतात. बापट साहेबांनी त्यांच्या पद्धतीने जो काही लोकसंग्रह केला, ते त्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट होते. प्रत्येकाला ते कमी अधिक प्रमाणात जमू शकत मात्र तेवढ त्यांच्या सारखं व्हायचं असेल त्यांच्यासारखं कामही करायला लागेल, असे एका ओळीत सांगता येईल. मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल. भाऊ नेहमी म्हणत, ‘ फ्लेक्स आणि होर्डिंग निवडक लावायचे पण होर्डिंग आणि फ्लेक्स वर नेता होता येत नाही. होर्डिंग आणि फ्लेक्स वर काम करता येत नाही. तुम्ही लोकांबरोबर किती जोडले गेलेत? लोक तुम्हाला खरंच मानतात का ? आणि तुम्हाला काम करता येतं का ? हे लोक फार बारकाईने बघत असतात. अधिकारी बारकाईने बघत असतात. आपण स्वच्छ मनाने चांगल्या पद्धतीने लोकांना मदत केली तर लोक लक्षात ठेवतात आणि त्यातूनच तुमचे नेतृत्व फुलते. ‘ हे बारकावे मला त्यांच्या व्यक्तिमत्वाकडून शिकायला मिळाले. अशा असंख्य गोष्टी त्यांच्या कामातून आणि बोलण्यातून मला शिकता आल्या. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी जोडलेले लोक. ते खासदार असतानाही त्यांच्यासोबत कायम असायचे. आपले प्रश्न गिरीश बापटच सोडवू शकतील, ही खात्री त्यांना होती. तेव्हा कार्यकर्ताच नव्हे तर सामान्य नागरिकांनाही आपण भाऊंकडे गेलो की मदत होईल, आपले प्रश्न मार्गी असा विश्वास असायचा.

अनेकदा लोक पूर्वी केलेल्या कामाबद्दल पेढे घेऊन त्यांच्याकडे यायचे. अशी लोकांची त्यांच्या घरी व कार्यालयात अक्षरशः रीघ लागायची. मोठ्या अपेक्षांनी आपल्याकडे आलेला नागरिक कुठल्या पक्षाचा, कुठल्या समाजाचा, कोणत्या घटकाचा आहे हे कधीही न पाहता त्याला मदत करणे, हे एकमेव ध्येय त्यांचे असायचे. अशाप्रकारची लोकांची कामे करून, लोकांमध्ये राहून वाटचाल पुढे नेली तर राजकीय वजन सुद्धा आपोआप वाढते आणि तुमच्या कामातून तुमची ओळख निर्माण होते. अशी त्यांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण करून दाखविली. त्यांच्यासोबत काम करत असताना खूप वेगवेगळे राजकीय आणि सामाजिक अनुभव आले. ५० वर्षे इतकी मोठी कारकीर्द पुण्याच्या राजकीय इतिहासात बहुदा कोणाचीच नसावी. नगरसेवक पदापासून कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री ते दिल्लीत खासदार पदापर्यंतची पदे भूषवलेला, व त्या पदांच्या माध्यमातून जनतेच्या न्याय, हक्क आणि विकासासाठी कायम झटलेला एकमेव नेता म्हणजे गिरीश बापट असे म्हणता येईल. भाजपचे काम करत असताना त्यांनी जी काही माणसे जोडली ती त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे, कामामुळे आणि आपल्या पद्धतीने विचार मांडण्याच्या प्रसंगानुरुप पद्धतीने. त्यांच्या याच स्वभाव वैशिष्ट्यांमुळे ते खऱ्या अर्थाने ‘ लोकनेते ‘ झाले. पुण्याच्या राजकीय पटलावर त्यांचे नाव अजरामर राहील.

-सुनील माने, भाजप पुणे शहर चिटणीस

महत्वाच्या बातम्या-