Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जावई आणि प्रसिद्ध उद्योजक निखिल नंदा (Nikhil Nanda) यांच्यावर उत्तर प्रदेशच्या बदायूं (Badaun) जिल्ह्यातील दातागंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर कंपनीच्या अन्य अधिकाऱ्यांवरही फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल-
पापड हमजापूर (Papad Hamzapure) गावातील रहिवासी ज्ञानेंद्र (Gyanendra) यांनी दातागंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा भाऊ जितेंद्र सिंह (Jitendra Singh) दातागंज येथे जय किसान ट्रेडर्स (Jai Kisan Traders) नावाने ट्रॅक्टर एजन्सी चालवत होता.
ज्ञानेंद्र यांच्या तक्रारीनुसार, ट्रॅक्टर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जितेंद्रवर विक्री वाढवण्याचा जबरदस्त ताण टाकला. यामध्ये एरिया मॅनेजर आशिष बलियान (Ashish Baliyan), सेल्स मॅनेजर सुमित राघव (Sumit Raghav), यूपी हेड दिनेश पंत (Dinesh Pant), फायनान्स कलेक्शन अधिकारी पंकज भास्कर (Pankaj Bhaskar), सेल्स मॅनेजर अमित पंत (Amit Pant), सेल्स हेड नीरज मेहरा (Neeraj Mehra), सीईओ निखिल नंदा (Nikhil Nanda) आणि शाहजहानपूर डीलर शिशांत गुप्ता (Shishant Gupta) यांचा समावेश आहे.
तक्रारीनुसार, जितेंद्रला विक्री न झाल्यास एजन्सीचे परवाना रद्द करण्याची तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली जात होती. या तणावामुळे जितेंद्रने आपल्या कुटुंबीयांसमोर आपली व्यथा अनेकदा मांडली होती.
जितेंद्रने घेतला आत्महत्येचा निर्णय-
तक्रारीनुसार, नोव्हेंबर 21 रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेवटच्या वेळी जितेंद्रच्या एजन्सीला भेट दिली आणि त्याला मानसिक त्रास दिला. त्यानंतर नोव्हेंबर 22 रोजी जितेंद्रने आत्महत्या केली. परिवाराने पोलिसांकडे तक्रार केली, मात्र कारवाई झाली नाही, असा आरोप ज्ञानेंद्र यांनी केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी दाखल केला गुन्हा-
तक्रारीचा तपास करत असताना, कोर्टाच्या आदेशावरून पोलिसांनी कंपनीचे सीईओ निखिल नंदा, यूपी हेड दिनेश पंत, एरिया मॅनेजर, सेल्स मॅनेजर आणि इतर अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती समाजमाध्यमांवर आणि स्थानिक पातळीवर वेगाने पसरत आहे. आता याप्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी होणार याकडे लक्ष लागले आहे.