Jitendra Awhad | राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निर्णयाला सत्तेमधीलच नेते छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील याला विरोध केलाय.
आज (29 मे) जितेंद्र आव्हाड यांनी महाडच्या चवदार तळे येथे मनुस्मृतीचं दहन करत सरकार विरोधात जोरदार आंदोलन केलं. मात्र, यावेळी त्यांच्या हातून चुकून आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेलं. आंबेडकरांचे पोस्टर फाडल्यामुळे आव्हाड यांच्यावर आता जोरदार टीका होत आहे.
आव्हाड यांनी फाडला आंबेडकरांचा फोटो
अशात अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी आव्हाड यांना गंभीर इशारा दिला आहे. “डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील.”, असं अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्वीट करत म्हटलंय.
“जाहीर निषेध!स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध. आव्हाडांनी (Jitendra Awhad) तात्काळ देशाची माफी मागावी.”, अशी मागणी देखील मिटकरी यांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मागितली माफी
आपली चूक लक्षात येताच आव्हाड यांनी माफी मागितली आहे. भावनेच्या भरात मनुस्मृतीविरुद्ध आंदोलन करत असताना मनुस्मृती हा शब्द लिहिला होता म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यावर बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने लक्षात राहिलं नाही. असं आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.
“या प्रकरणावर आता विरोधक राजकारण करतील.माझ्या हातून चूक झाली. मी अत्यंत लीन होऊन माफी मागतो. मनुस्मृती या शब्दाच्या रागापोटी ते पोस्टर फाडण्यात आलं. त्यात कुठेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे म्हणून फाडलं असं काहीही नाहीये.”, असं स्पष्टीकरण देखील यावेळी आव्हाड यांनी दिलं.