Anant Bhave l महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, पत्रकार आणि दूरदर्शनचे (Doordarshan) एकेकाळचे वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे (Anant Bhave) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी पुण्यात (Pune) निधन झाले. रविवारी रात्री अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपासून त्यांना पचनाशी संबंधित त्रास जाणवत होता.
वृत्तनिवेदन आणि साहित्य क्षेत्रातील योगदान :
प्रा. भावे यांनी ९० च्या दशकात दूरदर्शनवर (Doordarshan) सायंकाळच्या सत्रातील बातम्यांचे निवेदन केले. त्यांच्या निवेदन शैलीला एक खास ओळख होती. तब्बल २५ वर्षे त्यांनी हे काम केले. वृत्तनिवेदनासोबतच ते एक उत्कृष्ट बालसाहित्यिक (Children’s literature) म्हणूनही प्रसिद्ध होते. प्रा. भावे यांनी लहान मुलांसाठी ५० पुस्तके लिहिली, तसेच सुमारे ४०० कवितांची रचना केली. लहानांसाठी कथा आणि कविता सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. २०१३ मध्ये त्यांना साहित्य अकादमी (Sahitya Akademi) पुरस्काराने गौरवण्यात आले.
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आजच्या पिढीची भाषा आणि आवड बदलली आहे, त्यामुळे कविता वाचल्या जातीलच असे नाही, यावर भावे यांचा विश्वास होता. मुलांमध्ये कवितेची आवड निर्माण करण्यासाठी, त्यांच्यावर ‘ऐकण्याचा’ संस्कार करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना कविता जवळची वाटेल, असे ते मानत. २०२० मध्ये त्यांच्या पत्नी प्रा. पुष्पा भावे (Pushpa Bhave) यांच्या निधनानंतर ते अधिक एकाकी झाले होते.
सोमय्या महाविद्यालयात (Somaiya College) अध्यापन :
प्रा. अनंत भावे (Anant Bhave) यांनी मुंबईतील (Mumbai) सोमय्या महाविद्यालयात (Somaiya College) मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले. ते एक उत्तम विनोदी लेखक म्हणून ओळखले जात. ‘माणूस’ साप्ताहिकात ते नियमितपणे लेखन करत. ‘दिनांक’ साप्ताहिकातही त्यांनी अनेक लेख लिहिले. काही गमतीशीर कविताही त्यांनी लिहिल्या होत्या. दूरदर्शनवरील (Doordarshan) वृत्तनिवेदनामुळे ते राज्यभर परिचित होते.
ज्येष्ठ साहित्यिक संजय भास्कर जोशी (Sanjay Bhaskar Joshi) यांनी सांगितले, “प्रा. अनंत भावे (Anant Bhave) यांना वयोमानानुसार काही दिवसांपासून खूप त्रास होत होता. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी माझ्याकडून राजहंस प्रकाशनाची (Rajhans Prakashan) तीन पुस्तके वाचायला मागवून घेतली होती. या वयातही त्यांची विनोदबुद्धी जागृत होती आणि वाचन सुरू होते.”