बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठी पाऊल पडते पुढे… आदिवासी तरुणाच्या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक

नंदुरबार | सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हा एक तालुका. या अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील तरुणाने सर्वांना कौतुक वाटेल, अशी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. अनिल वसावे या तरुणाने दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच, आणि चढाईस कठीण असणाऱ्या किलीमांजारो, हे शिखर सर करण्याचा विक्रम केला आहे. यासोबतच अनिल हा आदिवासी समाजातील पहिला आतंरराष्ट्रीय गिर्यारोहक सुद्धा बनला आहे..

आपल्या हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अनिल लहानाचा मोठा झाला. सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात, पर्वतांवर वाढला. सातपुड्यातील छोट्या टेकड्या अनिल पळत पायाखालून घालत होता. कठीण वाटणारे डोंगर तो सहज भरभर चढून जाऊ लागला. उंचीच्या ठिकाणी जाऊन आजूबाजूचा प्रदेश, निसर्गाच्या अद्भुत किमया बघण्याचा त्याला जणू छंदच लागला. सातपुड्याच्या कठीण डोंगर, दऱ्याखोऱ्यातून फिरत असतानाच अनिलला उंच उंच भरारी घेण्याचं स्वप्न पडू लागलं. जे काम करण्यात आनंद वाटतो, समाधान वाटतं तेच आयुष्याचं ध्येय का बनु नये, असा विचार करत त्याने गिर्यारोहक बनण्याचं ध्येय निश्चित केलं आणि हे ध्येय, हे स्वप्नं पूर्ण करण्याच्या प्रयत्नांना सुरूवात झाली. मोठया मोहिमेवर जाण्यासाठीची जिद्द आणि चिकाटी त्यात होती. आता योग्य दिशा आणि मार्गदर्शन हवं होतं.

अशाच काळात त्याला 360 एक्सप्लोरर नावाच्या समुहाबद्दल माहिती मिळाली. हा समुह सुद्धा अनिल सारखाच निसर्गावर प्रेम करणारा, निसर्गाच्या सान्निध्यात रमणारा, विविध पैलू जवळून अनुभवणारा, ध्येयवेड्या गिर्यारोहकांचा होता. 360 एक्सप्लोरर समुह मोठया पर्वत शिखरांवर गिर्यारोहण करतात. यात सहभागी होण्यासाठी शारीरिक आणि मानसिदृष्ट्या तंदुरूस्त असावं लागतं. सातपुड्याच्या दुर्गम आणि प्रतिकूल परिस्थितीत कणखर बनलेल्या अनिलची 360 एक्सप्लोरर समूहात निवड झाली. 360 एक्सप्लोरर समुहाने नवीन मोहीम हाती घेतली होती, माऊंट किलीमांजारो सर करण्याची. काहीच दिवसांत टीम रवाना होणार होती. अनिलला स्वप्न सत्यात उतरणार असं दिसू लागलं. पण, स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र किंमत मोजावी लागते. मोहिमेसाठी अनिलला एकूण 4-5 लाखांचा खर्च येत होता. घरची परिस्थिती बेताचीच. खडकाळ माती शेतीतून जे उत्पन्न द्यायची त्यात फक्त उदरनिर्वाह व्हायचा. इतके पैसे आणायचे कुठून? कीलीमांजरो शिखरापेक्षा पैशाचा हा डोंगर पार करणं अनिल ला अवघड जात होतं. पण अनेकांना अनीलचे प्रामाणिक प्रयत्न दिसत होते. त्यांनी अनिल ला मदतीचा हात पुढे केला. ‘एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातून’ अनिलला आर्थिक मदत मिळाली. तसेच काही लोकांनी स्वतःहून अनिलला मदत करून त्याच्या प्रयत्नांना गती दिली. स्वप्न पुन्हा जिवंत झालं.

जानेवारी महिन्यात टीम दक्षिण आफ्रिकेकडे रवाना झाली. शेवटी तो दिवस आला, ज्यासाठी अनिलने अनेक रात्री जागून काढल्या होत्या. हवामानाचा अंदाज घेत, योग्य दिवस पाहून चढाईला सुरुवात झाली आणि भारतीय प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला अनील वसावे आणि टीमने ५,८९५ मीटर उंच चढाई करुन किलिमांजरो शिखरावर देशाचा तिरांगा फडकवला. स्वप्न सत्यात उतरलं. मेहनतीला फळ मिळालं.

या यशाबद्दल 360 एक्सप्लोरर समुहाचं युनायटेड नेशन्सच्या एसडीजीने सुद्धा ट्टविटरवरून अभिनंदन केल. जुलै महिन्यात दिल्लीत National Human Rights Organization कडून ‘इंडियन आयडॉल अवॉर्ड’ २०२१ या पुरस्काराने अनिलला सन्मानित करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर, ‘हाय रेंग ऑफ द रेकॉड’ आणि ‘इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड’ यात आता अनिलच्या नावाची नोंद होणार आहे. अनिलच्या या कामगिरीवर बऱ्याच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होतोय. मोठया पुरस्कारांनी अनिलला गौरवण्यात येत आहे. पण अनिलला पुरस्कारापेक्षा मदतीचा हात आणि कौतुकाची थाप हवी आहे. कारण, अनिल यावर न थांबता लगेच पुढच्या मोहिमेच्या तयारीला लागला आहे. आता त्याला रशियातील सर्वात उंच शिखर ‘माऊंट अल्ब्रस’ सर करायचा आहे.

ज्याचं नाव कोणाला माहीत नव्हतं, अशा दुर्गम भागातून येऊन, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर स्वप्न पुर्ण करणाऱ्या अनिल वसावे या गिर्यारोहकाला थोडक्यात टीमच्या खुप शुभेच्छा.

थोडक्यात बातम्या- 

‘मुंबईकरांनो घरातून बाहेर पडू नका’; किशोरी पेडणेकरांनी जोडले हात

…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील- संजय राऊत

लता मंगेशकरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली ‘इतक्या’ लाखांची मदत

‘भारतातील परिस्थिती अतिशय गंभीर’; अमेरिकेतील दिग्गज डॉक्टरांनी दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी जॉन अब्राहम आला धावून; उचललं हे मोठं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More