बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तो गेला, मात्र आपल्या जवळचं कुणीतरी गेलं ही भावना देऊन!

इरफान गेल्याची बातमी आली. पटकन ट्विटरला जाऊन खातरजमा केली. हिंदुस्थान टाइम्सने ब्रेकिंग केली होती. मी ट्विट केलं आणि व्हाट्सअपला ते ब्रॉडकास्ट केलं. धडाधड लोकांचे मेसेज यायला सुरुवात झाली. निम्म्याहून अधिक जणांचा मेसेज होता,

“काय सांगतो? अरे तो तर अॅडमिट आहे. कालच बातमी वाचली.”

“नक्की तोच गेलाय का? त्याची आई गेल्याची बातमी होती.”

गेल्या पाच सहा महिन्यांत अनेकदा इरफानबद्दल अशा बातम्या येत होत्या. त्यामुळे आजची बातमी खरी आहे का? याची खातरजमा करून घेतली पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत होतं. एरवी कधी मला रिप्लाय न करणाऱ्या अनेक जणांचे आजच्या मेसेजला रिप्लाय आले. अगदी ‘व्हॉट द फक’पासून ते ‘चांगला माणूस गेला राव’ इथपर्यंत. याला कारण होतं ते लोकांना इरफानबद्दल वाटणार प्रेम…

कुणी त्याचा अंग्रेजी मिडीयम आत्ताच पाहिला होता, कुणी कारवाबद्दल बोलत होते, काहीजण अगदी द नेमसेक, मकबूल, लंचबॉक्सपर्यंत गेले, कुणाला अगदी शाळेत असताना पाहिलेल्या चंद्रकांतामधला बद्रीनाथ सोमनाथ हा डबल रोल आठवला. ज्या लोकांबरोबर मी चित्रपटावर बोलेल असं कधी वाटलंही नव्हतं अशा लोकांशी आज मी बोललो. त्याला कारण होता इरफान. एरवी कधी कुणी गेलं तर लागले नसतील एवढ्या व्हाट्सअप स्टेटसला आज इरफानचा फोटो लागला. हे सगळं लोकांनी आपसूक केलंय. कुठंतरी इरफान आपल्यातला आहे ही भावना त्या पाठीमागे आहे. त्याचा अभिनय इतका भारी होता की सगळ्यांना तो आपलासा वाटायचा. दिसायला फारसा आकर्षक नसलेला इरफान त्याच्या अभिनयाने सगळ्यांना जिंकून घ्यायचा.

माझा मेसेज वाचून एका मित्राचा रिप्लाय आला की,

“He was a real actor. Unlike the ‘Models’ who everyone thinks are the actors in Bollywood these days.”

हा रिप्लाय लोकांना इरफानबद्दल काय वाटायचं हे सांगायला पुरेसा आहे. तो खान होता पण ‘खान’ नव्हता. तरीही तो या झगमगत्या दुनियेत तगला. नुसता तगलाच नाहीतर यशस्वी होऊन अगदी हॉलीवूडपर्यंत गेला. एरवी फारसे महत्वाचे रोल ना मिळणाऱ्या इतर भारतीय अभिनेत्यांसारखं त्याच नव्हतं. त्याने तिथेही आपलं नाणं खणखणीत वाजवलं.

माझं आणि त्याचं नातं एक फॅन आणि एका हिरोचं होतं. हिरो यासाठी की तो चित्रपटात होता म्हणून. तसा तर तो आपल्यातलाच वाटायचा. इतरांना वाटायचा तसाच. म्हणून कदाचित एखाद्या अभिनेत्याच्या जाण्याचं दुःख झालं. बॉलिवूडमधला एखादा अभिनेता/अभिनेत्री मरण पावते, त्याची बातमी येते, चित्रपट क्षेत्रातले आणि इतर काही निवडक लोक सोडले तर बाकीच्यांना त्याच्याशी फारसं घेणंदेणं नसतं. इरफानचं जाणं मात्र असं नव्हतं. त्याच्या जाण्याची बातमी आली तेव्हा सगळ्यांना धक्का बसला, आपल्या जवळचं कुणीतरी गेलं अशी भावना होती. तीही अगदी सगळ्यांची. आपल्या जाण्यानंतरही इरफानने लोकांच्या मनात ही भावना जागवली हेही त्याचं यशच मानावे लागेल.

लेखक- आदित्य गोपाळ गुंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More