बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इरफान, आमचा तुझ्यावर ‘हक्क’ आहे आणि तुझ्याशी आमचा ‘रिश्ता’ही कायम राहिल…

त्याचा पहिलाच चित्रपट हासिल पाहिला. चाॅकलेट बाॅय जिमी शेरगिल हिरोच्या भूमिकेत तर इरफान खान व्हिलनच्या… त्यानं तेव्हा माझ्या मनात जो व्हिलन तयार केला तो काल-परवा त्याचा इंग्रजी मेडियम पाहताना हिरो कधी झाला समजलाच नाही. चित्रपटातील अभिनेत्रीच्या बापाची भूमिका करताना त्याचं काम किती बाप आहे, हे सगळीकडे दिसत होतं. तसा तो कधी हिरो झालाच नाही. मनात तुमच्या असंख्य कप्पे असतील तर त्याची जागा कायम वेगळीच. एकदम स्पेशल… जिथं कुणालाच जागा नाही, तो सगळंच कसं डोक्यात जाणारं करतो? त्याचाही सिनेमाही डोक्यात जातो, त्याचं कामही डोक्यात जातं…

त्याचा ‘मकबुल’ आला तेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो पण चित्रपट पाहिला तो इंजिनिअरिंगला आल्यावर… तेव्हाच इरफान डोक्यात फिट झाला. अनेक असे कलाकार असतात ज्यांचं काम तुम्हाला आवडतं, त्याचं तुम्ही कौतूक करता, पण इरफानने चित्रपटात काय केलंय हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही. तो थेट घुसतो. त्याचा चित्रपट पाहिला की त्याची कलाकारी तुमच्यावर स्वार होते. त्याने काय काम केलंय हे सांगता न येताही त्याने केलेली ती भूमिका तुम्हालाही जगावी वाटते.

हाच इरफान सगळ्यात वेगळं वाटण्याचं कारण म्हणजे तो जे काही शहरी व ग्रामीण ढंगातील मिश्र भूमिका करतो ते… त्यामुळे त्याचं काम आवडणारा वर्ग हा फक्त शहरी किंवा ग्रामीण नाही तर तो सगळीकडे दिसतो. हिंदी मेडियम चित्रपटात तर त्याने अशा दोन्ही भूमिकांचं जबरदस्त मिश्रण करत अक्षरश: धिंगाणा घातलाय. एक विशिष्ट टोन घेऊन जेव्हा तो या चित्रपटात डायलाॅग डिलीवर करतो तेव्हा आपण चित्रपट पहायला सुरुवात करुन नक्कीच काही चुकिचं केलं नाही, याचा अनुभव येतो.

इरफानने कोणत्या कोणत्या चित्रपटांत काम केलंय याची नुसती यादी जरी पाहिली तरी कळतं की त्याने केलेल्या भूमिका, चित्रपट किती वेगळे होते. अनेक वेळा जुने सिनेप्रेमी हे त्यांच्या काळातील अभिनेते कसे होते किंवा ते कसे वेगळे होते याची उदाहरणं देतात. परंतु मला वाटतं इरफान तेव्हा असता तर त्यांनाही पुरुन उरला असता. तो कधीच शाहरुख, सलमान वर्गातला अभिनेता नव्हता. तो कधीच मुख्य भूमिका किंवा लोकप्रिय भूमिकांसाठी बनलेला अभिनेता नव्हता. तो जे करायचा ते लोकप्रिय व्हायचं, तो जो रोल करायचा तीच चित्रपटातील मुख्य भूमिका व्हायची.

हे सगळं करताना इरफान इतकं सहज सोप्पं करायचा की वाटायचं कुणीही सहज करेल. पण असं ना कुणाला जमलं ना कुणाला जमेल. त्याचे समकालीन आणि त्याच्याशी स्पर्धा असणारे मनोज वाजपेयी किंवा नवाजुद्दीन सिद्दीकालाही तो त्याचा याच गुणवैशिष्ट्यांमुळे भारी ठरतो. त्याच्याकडे जी सहज अभिनय करायची कला होती ती मनोज वाजपेयी किंवा नवाजुद्दीन सोडाच अन्य कुणाच्याही कामात कधी दिसली नाही.

मकबुलमध्ये बाप अभिनेता असलेल्या पंकज कपूरसमोर त्याने जी मकबुलची भूमिका केली आहे, ती मला नाही वाटत कुणाला जमली असती. लाईफ इन मेट्रोमधील एक प्रियकर आपल्या होणाऱ्या प्रेयसीचं टेन्शन कमी करण्यासाठी ओरडण्याचा सल्ला देतो तो चित्रपटातील क्षण आजही विसरणे केवळ कठीण आहे. एकाच वर्षी पान सिंग तोमर व लाईफ ऑफ पायसारख्या वेगळ्या भूमिका करुन त्याने चाहत्यांची मनं जिंकली.

‘भाई मैय्यत पे रोमांस मत कर” ”रोती हुई औरत और दूध वाले पर कभी भरोसा नहीं करना चाहिए” किंवा दोन परदेशी पर्यटकांना जेव्हा तो म्हणतो, ”नहाते क्यों नहीं हो तुम लोग? गांजा चरस फूंक-फूंककर खाली हो गया सारा। समझोगे कैसे? गंजेड़ियों?” तेव्हा त्याच्या कामातील एक वेगळाच पैलू समोर येतो. नुसतं इमॅजीन करुन पहा हे कारवान सिनेमातील डायलाॅग दुसऱ्या कोणत्या अभिनेत्याच्या तोंडात कसे वाटले असते. इरफान त्याच्या जागी तुम्हाला पर्यायच देत नाही. तो जिथं उभा असतो ते सगळं साम्राज्य तो त्याचं करतो. कधी कधी वाटतं इरफानमुळे डिरेक्टरसमोरही फार पर्याय रहात नसतील.

अगदी अलिकेडे आलेल्या ब्लॅकमेलमधील निंदरा दिया गाण्यातील त्याची कलाकारी आणि बायको जेव्हा बेवफाई करते तेव्हा केलेला कॅज्युअल रोल या एकाच चित्रपटातील भूमिकेत किती फरक आहे. एकाच चित्रपटातील भूमिकेला एवढे कंगोरे असणारा कलाकार सापडणं अशक्यच. एकाच चित्रपटात इरफान दिग्दर्शकाला फुकटात १०-१५ रोल हातोहात करुन द्यायचा तेही एकाच भूमिकेचे पैसे घेऊन. तलवारमधील आश्विन कुमार साकारताना तो तुमच्या समोर पर्याय ठेवतो. तो तुम्हाला विचार करायला लावतो. काहीतरी उत्तरं सांगून तुम्हाला मोकळं करत नाही.

त्याचे जवळपास बरेचसे सिनेमे हे मोठ्या स्क्रीनवर पाहिले. अंग्रेजी मेडियम पण तसाच पहायचा होता. परंतु सिनेमा लाॅकडाऊनपुर्वी १३ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित झाला व काही दिवसांत लाॅकडाऊनमुळे तो अनेकांना पाहता आला नाही. काही दिवसांनी हाॅटस्टारवर आला व त्यात तो पहिला फिल नव्हता. इरफानची ती नेहमीची भट्टी यात जमून आली नव्हती. त्यालाही याची खंत वाटली असेल.

”लोगों को हक जमाना आता है, रिश्ता निभाना नहीं आता” हा इरफानच्याच सिनेमाचा डायलाॅग. इरफान आमचा तुझ्यावर हक्कही आहे आणि तुझ्याशी आमचा रिश्ताही कायम राहिल… तु आमच्यासाठी रियल लाईफ आनंद आहेस…

लेखक- शरद डी. बोदगे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More