ATM In Train l मध्य रेल्वेने ऐतिहासिक पाऊल उचलत पंचवटी एक्स्प्रेसमध्ये (Panchavati Express facility) धावत्या गाडीत ATM बसवण्याची सुविधा सुरू केली आहे. मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या या गाडीतील प्रवाशांना आता प्रवासादरम्यानच रोख रक्कम काढण्याची सोय मिळणार आहे. ही सेवा सध्या चाचणीच्या टप्प्यात असून लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार आहे.
पहिल्यांदाच धावत्या एक्स्प्रेसमध्ये ATM, बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार :
भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या ‘नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल योजना’च्या बैठकीत रेल्वे गाड्यांमध्ये ATM बसवण्याची कल्पना मांडण्यात आली होती. या संकल्पनेला बँक ऑफ महाराष्ट्रने (Bank of Maharashtra) सकारात्मक प्रतिसाद देत “नवीन, नाविन्यपूर्ण गैर-भाडे महसूल कल्पना योजना” (NINFRIS) अंतर्गत प्रस्ताव सादर केला. सध्या गाडी क्रमांक 12110 मनमाड-मुंबई सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेसमध्ये या ATM सुविधेची कार्यक्षमता आणि व्यवहार्यता तपासली जात आहे. (Panchavati Express facility)
या गाडीची आसन क्षमता 2032 असून दररोज सुमारे 2200 प्रवासी याचा लाभ घेतात. सर्व डबे वेस्टिब्यूल कनेक्टेड असल्याने कोणत्याही डब्यातील प्रवासी ATM पर्यंत सहज पोहोचू शकतात. हा ATM एसी चेअर कार डब्यात बसवण्यात आला असून, मुंबईत मंगळवारी सकाळी ही सेवा असलेली ट्रेन दाखल झाली.
ATM In Train l सुसज्ज कोच, सातत्यपूर्ण नेटवर्क आणि प्रगत तांत्रिक सुविधा :
मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये तांत्रिक बदल करून खास कोच तयार करण्यात आला आहे. या कोचमध्ये ATM युनिट बसवण्यात आले असून, चालत्या गाडीत सुरक्षित आणि सुरळीत व्यवहार होण्यासाठी विशेष विद्युत प्रणाली व संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मोबाईल नेटवर्कशी सतत जोडलेले हे ATM खऱ्या वेळेत व्यवहार करण्यास सक्षम आहे.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही सेवा विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आकस्मिक गरज असलेल्या प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. भारतीय रेल्वेच्या विद्युत व यांत्रिक विभागांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. (Panchavati Express facility)