Income Tax | आयकर विभाग (Income Tax Department) आता पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय झाला असून, तुमच्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. केवळ डिजिटलच नव्हे, तर मोठ्या रोख रकमेच्या व्यवहारांमुळेही तुम्हाला आयकर विभागाची नोटीस (Income Tax Notice) येऊ शकते. विभाग डेटा अॅनालिटिक्स (Data Analytics) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) साहाय्याने उत्पन्न आणि खर्चातील तफावत शोधून काढतो.
आयकर विभागाची नजर चुकवणे कठीण
अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की आयकर विभाग फक्त ऑनलाइन किंवा डिजिटल व्यवहारांवर लक्ष ठेवतो. मात्र, बँका आणि इतर वित्तीय संस्थांना एका ठराविक मर्यादेपलीकडील सर्व मोठ्या रोख व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक आहे. तुमच्या बँक ठेवी, गुंतवणूक, मालमत्ता खरेदी-विक्री आणि क्रेडिट कार्ड वापरासंबंधी माहिती विभागापर्यंत पोहोचते.
जर तुमच्या घोषित उत्पन्नात आणि तुमच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी तफावत आढळल्यास, आयकर विभाग तुम्हाला स्पष्टीकरण विचारण्यासाठी नोटीस पाठवू शकतो. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास किंवा पैशांचा स्रोत स्पष्ट न केल्यास चौकशी होऊन दंडही भरावा लागू शकतो.
‘हे’ ५ रोख व्यवहार आणू शकतात नोटीस
१. बचत खात्यात १० लाख किंवा अधिक रोख जमा करणे (एका आर्थिक वर्षात),
२. १० लाख किंवा अधिक रकमेची रोख एफडी (FD) करणे,
३. शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉण्ड्समध्ये १० लाख किंवा अधिक रोख गुंतवणे,
४. दरमहा १ लाख किंवा अधिक क्रेडिट कार्ड बिल रोखीने भरणे, आणि
५. ३० लाख किंवा अधिक किमतीच्या मालमत्तेसाठी रोख रक्कम देणे – हे व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकतात.
मालमत्ता खरेदीतील रोख रकमेची मर्यादा काही ठिकाणी वेगळी असू शकते, परंतु मोठ्या रकमेच्या कोणत्याही रोख व्यवहाराचा स्रोत स्पष्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. रोख व्यवहारांचा डिजिटल रेकॉर्ड नसल्याने ते संशयाच्या भोवऱ्यात येतात. त्यामुळे, मोठे व्यवहार शक्यतो डिजिटल माध्यमातून करावेत आणि सर्व व्यवहारांचा हिशोब व उत्पन्नाचा स्रोत तयार ठेवावा, अन्यथा आयकर विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. (सूचना: गुंतवणूक सल्ला आणि जोखमीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. लेखातील माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे.)
Title : Avoid Income Tax Notice: Beware of These 5 Cash Transactions