Babanrao Taywade | राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. तर, काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यांनी राज्य सरकारला एक महिन्याचा अवधी देत तात्पुरते आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र, आता ओबीसी नेते पुढे आले आहेत. त्यामुळे सरकारपुढे दुहेरी प्रश्न निर्माण झाला असल्याचं चित्र आहे.
अशात मनोज जरांगे यांच्यावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी टीका केली आहे. जरांगे दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, त्यांची उंची आहे का?, अशी टीका तायवाडे यांनी केली आहे. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होतेय, असा आरोप (Babanrao Taywade) देखील केला आहे.
बबनराव तायवाडे काय म्हणाले?
“जरांगे पाटील ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात.त्यांची एवढी ऊंची आहे का?, अगोदर याचा विचार व्हायला हवा. एखाद्या व्यक्तीचे राजकीय करीअर संपवणे किंवा तुमच्या जातीच्या भरवशावर त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ यांच्या पाठीमागे उभे राहतील आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपू देणार नाही.”, असा इशाराच यावेळी तायवाडे यांनी दिला आहे.
तसंच पुढे ते म्हणाले की, “छगन भुजबळ हे राज्यातील एकमेव ओबीसी मधील मोठे नेते आहेत. जर, त्यांचं अस्तित्व संपवण्याची भाषा केली जात असेल तर, येणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाला पाडते, हे दाखवून देऊ”, असं बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) म्हणाले आहेत.
मनोज जरांगे काय म्हणाले होते?
“विरोधी लोक बोंबलत आहेत, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यांचा नेता बोंबलत आहे. मराठ्यांनी मतं देऊनही ते तुमच्या छाताडावर पाय देत आहेत. तुम्ही मतदान करुनही त्यांना जातीचा इतका स्वाभिमान असेल तर मग तुम्हाला का नसावा?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी मराठा नेत्यांना केला आहे.
तसंच, त्यांचे नेते त्यांच्या समाजाच्या आंदोलनात जात असतील तर आता मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना, बैठकांना आलं पाहिजे. आम्हीही आमच्या जातीच्या मोर्चात जाऊ, असे मराठा नेत्यांनी सांगितले पाहिजे, असंही जरांगे पाटील म्हणाले होते. त्यामुळे सध्या जरांगे आणि ओबीसी नेते यांच्यात वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसून येतंय.
News Title – Babanrao Taywade On Manoj Jarange Patil
महत्त्वाच्या बातम्या-
ह्युंदाई कंपनीची ‘ही’ इलेक्ट्रिक कार मार्केटमधून बंद होणार
सलमान खान गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांना मिळाला मोठा पुरावा!
अगदी वरचा देव जरी आला तरी… उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड
ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनेज’ होती; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप
ओबीसींसाठी महत्वाचा दिवस; लक्ष्मण हाकेंच्या भेटीला ‘हे’ मोठे मंत्री जाणार