Babasaheb Aage | बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भरदुपारी भररस्त्यात भाजपच्या (BJP) एका स्थानिक पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत असलेल्या बीडमध्ये आता पुन्हा कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
भरदिवसा प्राणघातक हल्ला-
मृत भाजप पदाधिकाऱ्याचे नाव बाबासाहेब आगे (Babasaheb Aage) असून, ते माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य होते. तसेच, ते भाजपचे विस्तारक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास बाबासाहेब आगे हे भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांची भेट घेण्यासाठी स्वामी समर्थ मंदिराजवळील पक्ष कार्यालयात आले होते.
या भेटीदरम्यान, भाजप कार्यालयाबाहेरच एक व्यक्तीने त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. या प्राणघातक हल्ल्यात बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांचा मृतदेह (Babasaheb Aage) रक्ताच्या थारोळ्यात बराच वेळ पडून होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामुळे संतापाचा उद्रेक झाला आहे.
आरोपीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठलं-
या घटनेनंतर आरोपी नारायण शंकर फपाळ याने थेट माजलगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःहून आत्मसमर्पण केले. त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
आरोपीने हल्ल्याच्या वेळी कोयता आपल्या शर्टच्या मागच्या बाजूस लपवलेला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आगे यांच्याजवळ पोहोचताच त्याने तो कोयता काढून सपासप वार केले. या थरारक हल्ल्यात बाबासाहेब आगे यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून सध्या तपास सुरू असून, ही हत्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाली असावी असा प्राथमिक संशय आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे माजलगावसह संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.