मुंबई | मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर बच्चू कडू (Bachhu Kadu) आनंदी झाले. यावेळी मंत्रिपद मिळणार असल्याने तुम्ही आनंदी आहात का? असं पत्रकारांनी बच्चू कडूंना विचारलं. यावर कडूंनी प्रतिक्रिया दिली.
मंत्रिपद वगैरे चुलीत घाला. तुम्ही शेवटी त्याच मुद्द्यावर येता. माझ्यासाठी मंत्रिपद फार महत्त्वाचं नाही. मंत्री तर मी होणारचं आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.
मला वाटतं की, मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु:ख आता मी विसरून गेलो आहे. नवीन सुखाची पाऊलवाट आता सुरू झाली आहे. दिव्यांग मंत्रालयाला मंजुरी मिळाली आहे. मला आत्मविश्वास आहे की, दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्रीही बच्चू कडूच असेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदेंनी शब्द दिला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलं आहे. पण आधी सेवा करू. दिव्यांगाच्या शेवटच्या घरापर्यंत सेवा देऊ. हे मंत्रालय केवळ मंत्रालयापुरतं मर्यादीत राहणार नाही, असंही कडू म्हणालेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मी अनेकदा दिव्यांगांसाठीच्या कामाचा प्रस्ताव ठेवला पण त्याला यश आलं नाही. आता शिंदे सरकारच्या काळात या कामांना गती मिळाली आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
दरम्यान, दिव्यांगांसाठी काम करणं हे पुण्याचं काम आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या कामात आता दिरंगाई होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-