Gold Smuggling l मुंबई (Mumbai) विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (Air Intelligence Unit) एका प्रवाशाला सोन्याची तस्करी करताना रंगेहात पकडले. बँकॉकहून आलेल्या या प्रवाशाने तब्बल सव्वा कोटी रुपयांचे सोने आपल्या शरीरात लपवून आणले होते.
शरीरात लपवले सोने :
मोहम्मद वासिफ शेख (Mohammad Wasif Shaikh) नावाच्या २६ वर्षीय आरोपी प्रवाशाकडून हे सोने जप्त करण्यात आले. तो मूळचा गुजरातचा (Gujarat) असून, पत्नीसोबत बँकॉकहून मुंबईत आला होता. शेख सोन्याची तस्करी करणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नजर ठेवली होती.
विमानतळावर उतरल्यानंतर, दोघे ग्रीन चॅनलमधून बाहेर पडत असताना, अधिकाऱ्यांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे शुल्क भरण्याजोगे काही सामान आहे का, अशी विचारणा केली असता, त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. अधिकार्यांना संशय आल्याने त्याची एक्स-रे (X-ray) तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्याने गुदद्वारात सोने लपवल्याचे उघड झाले.
पत्नीचा सहभाग नाही :
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीच्या सामानात देखील काही सोने सापडले. मात्र, या तस्करीमध्ये तिचा कोणताही सहभाग नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले, की त्याने केवळ पत्नीला एक पॅकेट देऊन ते बॅगेत ठेवण्यास सांगितले होते. त्या पॅकेटमध्ये काय आहे, याबाबत तिला काहीही माहिती नव्हती. त्याच्या जबाबानंतर, अधिकाऱ्यांनी फक्त त्याच्यावरच सोन्याच्या तस्करीचा गुन्हा दाखल केला. तसेच, एका व्यक्तीने त्याला या कामासाठी ४० हजार रुपये देण्याचे कबूल केले होते, असेही त्याने सांगितले.