Bapu Andhale Murder | परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) यांच्या खून प्रकरणात फरार असलेला बबन गित्तेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आठ महिन्यांहून अधिक काळ फरार असलेल्या बबन गित्तेवर (Baban Gitte) कायद्याचा फास आवळला जाणार आहे. प्रशासनाकडून त्याची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पोलिसांनी गित्तेच्या मालमत्तेची माहिती मागवली असून, त्याची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला जाणार असल्याचे समजते.
बापू आंधळे यांची हत्या
मरळवाडी गावचे, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सरपंच बापू आंधळे यांची जून 2024 मध्ये गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गित्ते आणि इतर पाच जणांविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा परळी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर बबन गित्ते फरार झाला.
पोलिस तक्रारीतील माहिती
पाच जणांनी संगनमताने शहरातील बँक कॉलनी परिसरात सरपंच बापू आंधळे आणि ग्यानबा गित्ते या दोघांना बोलावून घेतले. बापू आंधळे यांना ‘तू पैसे आणलेस का?’ असे बबन गित्तेने विचारले.
पैशांच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि बबन गित्तेने कमरेचे पिस्तूल काढून बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली. दुसऱ्या एका व्यक्तीने कोयत्याने वार करून बापू आंधळे यांना ठार केले. तसेच, ग्यानबा गित्तेला तिसऱ्या व्यक्तीने छातीत गोळी मारून जखमी केले, असे आंधळे यांच्या हत्येनंतर दाखल केलेल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
Title : Bapu Andhale Murder Case Absconding Baban Gittes Troubles Increase