Baramati l बारामतीमधील (Baramati) चर्चेस ऑफ ख्राईस्ट बॉईज होममधून (Churches of Christ Boys Home) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे बारामती शहर हादरले आहे.
या बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक रॉबर्ट गायकवाड (Robert Gaikwad) यांच्या जाचाला कंटाळून या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. रॉबर्ट गायकवाडला अटक केल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.
2016 पासून जवळपास 24 मुले या हॉस्टेलमधून बेपत्ता झाली होती. त्यापैकी 16 मुले सापडली, तर तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही 5 मुलांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव (Deepak Jadhav) यांनी अधीक्षक रॉबर्ट गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गायकवाड यांनी घटनेच्या दिवशी आपण बाहेरगावी गेलो होतो, असे सांगत जबाबदारी झटकली आहे.
24 FIR दाखल :
2016 पासून तब्बल 24 मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राजवीर शिंदे (Rajveer Shinde) या मुलाचा मृतदेह सापडला. बारामतीतील चर्च ऑफ ख्राईस्ट बॉईज होममधील हा मुलगा निरा डावा कालव्यात बुडाला होता. त्याचा 36 तासांपासून शोध सुरू होता. 2016 पासून 24 मुले बेपत्ता झाल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) 24 एफआयआर (FIR) दाखल झाल्या आहेत, तरीही जबाबदार व्यक्तींवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
बॉईज होममध्ये गैरप्रकार? :
बेवारस आणि अनाथ मुलांच्या संगोपनासाठी बारामतीत चर्च ऑफ ख्राईस्ट बॉईज होम उभारण्यात आले आहे. समाज कल्याण विभाग (Social Welfare Department) आणि धर्मदाय आयुक्त (Charity Commissioner) यांच्या अखत्यारीत चालणाऱ्या या बॉईज होममध्ये अधीक्षक रॉबर्ट गायकवाड मुलांना त्रास देत असल्याचा आरोप शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. बॉईज होममध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा मुलांना दिल्या जात नाहीत, उलट मुलांना वैयक्तिक घरची कामे करायला लावली जातात आणि प्रसंगी मारहाण केली जाते. त्यामुळे अधीक्षकाच्या जाचाला कंटाळून मुले बेपत्ता होत आहेत किंवा कॅनॉलच्या पाण्यात उड्या मारून जीवन संपवत आहेत. अधीक्षकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ट्रस्टचे सदस्य जय काळे (Jay Kale) यांनी केली आहे.
दरम्यान, या संदर्भात ट्रस्टच्या नियामक मंडळाची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन बेपत्ता मुलांबाबत काय झाले, यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी संस्थेकडून पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत आपल्याला कोणतीच माहिती दिली जात नसल्याची तक्रार केली आहे. मुले बेपत्ता झाल्यानंतरही अधीक्षकांकडून आपल्याला कळवले जात नाही, असे सांगत अधीक्षक रॉबर्ट गायकवाड हेच जबाबदार असल्याचे अध्यक्षांनी म्हटले आहे.