Beed News l बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील विरोधकांवरील व्हिडीओ एकामागून एक बाहेर येत असल्याने मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांचे गैरकृत्य समोर आले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
बीडमध्ये शोरूम मॅनेजरला मारहाण :
बीडमधून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शोरूम मॅनेजरला मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ही मारहाण आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएच्या उपस्थितीत घडल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ 12 डिसेंबर 2024चा असल्याचे बोलले जात असले तरी तो आता अचानक बाहेर आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
तसेच बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, त्यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांवर आरोपांचे सत्र सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी विभागात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. आता हे प्रकरण थेट ईडीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशातच सुरेश धस यांच्या जवळच्या व्यक्तीचे खोक्या भाई विविध प्रकारचे कारनामे बाहेर येत आहेत.
Beed News l धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय आहेत का? :
धनंजय मुंडेंच्या विरोधात उभे राहिलेल्या सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडीओ एका मागोमाग समोर येत असल्याने हा निव्वळ योगायोग आहे का, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जयमल्हार बागल यांनी ही मारहाण केल्याचं बोलले जात आहे. तसेच राजकीय डावपेचांचा भाग म्हणून हा व्हिडीओ आता व्हायरल करण्यात आला असल्याचा संशय काही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
मात्र आता या संपूर्ण घडामोडीमुळे बीड जिल्ह्यातील राजकारण अधिक तापले आहे. धनंजय मुंडे पडद्यामागून सक्रिय आहेत का, असा प्रश्न अनेक राजकीय निरीक्षक विचारू लागले आहेत. आता या प्रकरणात कोणती नवीन माहिती समोर येते आणि विरोधकांवर आणखी कोणते आरोप होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.