Beed Sarpanch Murder l बीड जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी एसआयटी (SIT) आणि सीआयडी (CID) च्या सखोल तपासानंतर बीड न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात वाल्मिक कराड (Valmik Karad) हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, खंडणी, ॲट्रॉसिटी, अपहरण आणि हत्या या सर्वच गुन्ह्यांमध्ये वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीचा सक्रिय सहभाग असल्याचे समोर आले आहे.
ही टोळी कोणाच्या छायेत गुन्हे करत होती? :
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासानंतर 80 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा गुन्हा संघटित गुन्हेगारीच्या चौकटीत होत असल्याचा दावा केला आहे.
त्यांच्या मते, गुन्हेगारांना वरदहस्त लाभला असल्यामुळेच हे धाडस झाले. “तुम्ही गुन्हे करा, मी तुमच्या मागे आहे,” अशा पद्धतीने आरोपींना समर्थन मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांच्या भावाची हत्या करण्यात आली असून, गुन्हेगार पोलिसांच्या संगनमताने मोकाट फिरत होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
Beed Sarpanch Murder l आरोपपत्रातील धक्कादायक माहिती :
आरोपपत्रात खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्येचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. तपासानुसार, २९ नोव्हेंबर रोजी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याच्या फोनवरून वाल्मिक कराड याने खंडणी मागितली होती. तर ६ डिसेंबरला संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले यांच्यात वाद झाला होता.
पोलीस तपासात वाल्मिक कराड विरोधातील ठोस पुरावे मिळाले असून, पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब नोंदवले आहेत. याशिवाय, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात झालेल्या संभाषणात, “जो कोणी आपल्या आड येईल, त्याला सोडणार नाही,” असे कराडने घुलेला सांगितल्याचे समोर आले आहे. त्यानंतरच घुलेने अवादा कंपनीत जाऊन खंडणी मागितली होती.