Beed News l बीड (Beed) जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका तरुणाला अर्धनग्न करून मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ही मारहाण भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या निकटवर्तीय कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale) याने केल्याचा आरोप आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी हा व्हिडीओ एक्स (X) प्लॅटफॉर्मवर शेअर करत राज्याच्या गृहखात्यावर आणि आमदार सुरेश धस यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
व्हिडीओ व्हायरल, अंजली दमानियांची टीका :
बीडमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने खळबळ उडवली होती. त्यानंतर आता शिरूर तालुक्यातील बावी (Bavi) गावात एका युवकाला अर्धनग्न करून मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
अंजली दमानिया यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? गृहमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) आणि आमदार सुरेश धस यांनी या घटनेवर उत्तर द्यावे. आरोपी सतीश भोसले हा धस यांचा कार्यकर्ता आहे का? इतक्या गंभीर घटनेनंतरही अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल झालेला नाही?”
Beed News l आमदार सुरेश धस यांचे स्पष्टीकरण :
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार सुरेश धस यांनी मारहाण करणारा सतीश भोसले हा त्यांचा कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे. मात्र, त्यांनी सांगितले की, “हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मी पोलिसांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी समजले की, ही घटना एका साखर कारखान्याच्या आवारात घडली होती आणि ऊसतोड मजुराच्या घरातील महिला किंवा मुलीच्या छेडछाडीच्या घटनेनंतर हा प्रकार घडला. ही घटना दीड वर्षांपूर्वीची आहे, आणि कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.”
धस पुढे म्हणाले, “मारहाण करणारा कार्यकर्ता आमचा असला तरी तक्रार आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी सूचना मी पोलिसांना दिली आहे.”
या घटनेमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी आणि राजकीय आश्रय या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप अधिकृत कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.