बीड जिल्ह्यात कुणाचं पारडं जड?, शरद पवार अन् जरांगे पॅटर्न का येतंय चर्चेत?

Beed Vidhansabha Election 2024 | आज (15 ऑक्टोबर ) साडे तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या निवडणुकीकडे लागलं आहे. महाराष्ट्रात यंदा महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मविआला चांगलं यश मिळालं. त्यामुळे मविआ नेत्यांचा विश्वास वाढला आहे. (Beed Vidhansabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 30 तर महायुतीला 17 जागांवर विजय मिळाला होता. लोकसभेच्या निकालादरम्यान, सर्वात शेवटी बीड मतदार संघाचा निकाल लागला होता. तेव्हा बीडमध्ये तणाव देखील निर्माण झाला होता. बीडमध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे निवडून आले. आता विधानसभा निवडणुकीतही बीडवर सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही पूर्णतः निकालात न निघाल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. लोकसभेत बीडमध्ये जरांगे पॅटर्न दिसून आलं. बीडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरला. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला.त्यानंतर, भाजपनं विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी दिली.

दुसरीकडे, परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हेच यंदाच्या निवडणुकीत उमेदवार आहेत. यंदा त्यांना पंकजा मुंडे यांची देखील साथ मिळेल. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विज्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राहील.राज्यात महायुती व महाआघाडी अस्तित्वात आल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणत्या ठिकाणी कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता राहील.

बीडमध्ये 2019 मध्ये कुणी बाजी मारली?

2019 मध्ये सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे 6 मतदारसंघ आहेत. या सहापैकी गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार, केजमधून भाजपा नेत्या नमिता मुंदडा आमदार बनल्या. भाजपने येथे 2 जागा जिंकल्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं माजलगावमधून प्रकाश सोळंके, बीडमधून संदीप क्षीरसागर, परळीतून धनंजय मुंडे आणि आष्टीमधून बाळासाहेब आजबे यांना निवडून आणले.मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आता पडलेल्या फूटीनंतर यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली आहेत. (Beed Vidhansabha Election 2024)

राज्यात बदललेल्या राजकीय स्थितीनुसार महायुतीकडे आता पाच आमदार आहेत. त्यामध्ये भाजपच्या दोन आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांचा समावेश आहे.तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत संदीप क्षीरसागर हे एकच आमदार आहेत.

बीड जिल्ह्यातील आमदारांची यादी

गेवराई विधानसभा – लक्ष्मण पवार (भाजप)
माजलगाव विधानसभा – प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी – अजित पवार)
बीड विधानसभा – संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – शरद पवार)
आष्टी विधानसभा – बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी – अजित पवार)
केज विधानसभा – नमिता मुंदडा (भाजप)
परळी विधानसभा – धनंजय मुंडे (राष्ट्रवादी – अजित पवार)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या मागे 5 आमदारांचे संख्याबळ असतानाही देखील त्या पराभूत झाल्या. केज आणि गेवराई या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असून देखील बजरंग सोनवणे यांना आघाडी मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे 6550 मतांनी विजयी झाले. लोकसभेचा निकाल पाहता विधानसभा निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात विधानसभेतही मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट दिसून येण्याची शक्यता आहे.त्यातच जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेणार, यावर देखील येथील निवडणुकांचा निकाल अवलंबून असेल, अशी चर्चा आहे. (Beed Vidhansabha Election 2024)

News Title :  Beed Vidhansabha Election 2024 

महत्वाच्या बातम्या-

लाडक्या बहिणींना मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस; या 3 अटी लागू

राज्यात कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ?, वाचा सर्व माहिती एका क्लिकवर

बोपदेव घाटातील प्रकरण ताजं असतानाच पुण्यात घडली आणखी एक धक्कादायक घटना!

आचारसंहिता म्हणजे काय? ‘या’ दरम्यान कोणत्या गोष्टींवर बंदी असते?

थोड्याच वेळात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार!