Bhaiyyaji Joshi on Marathi l राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी “मुंबईत प्रत्येकाला मराठी शिकण्याची गरज नाही” असे वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम (Ram Kadam) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राम कदम यांनी काय स्पष्टीकरण दिले? :
राम कदम यांनी भय्याजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “भय्याजी जोशी आदरणीय व्यक्ती आहेत, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की, घाटकोपरच्या काही भागांमध्ये गुजराती भाषिक लोक जास्त प्रमाणात राहतात, त्यामुळे तिथं ती भाषा प्रामुख्याने बोलली जाते. मात्र, मुंबईची भाषा कालही मराठी होती, आजही मराठी आहे आणि आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत मराठीच राहील.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वादावर भाष्य करताना “मी जोशींचं वक्तव्य ऐकलेलं नाही, पण महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे. आम्ही कुठल्याही भाषेचा अपमान करत नाही, परंतु मराठी भाषेचा सन्मान राखला पाहिजे.” असे स्पष्ट केले.
Bhaiyyaji Joshi on Marathi l आदित्य ठाकरेंचा आक्रमक पवित्रा :
शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “त्यांनी मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्य सरकारने मराठी भवन आणि गिरगाव दालनही रद्द केलंय. मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. त्यामुळे भय्याजी जोशींवर कारवाई झाली पाहिजे.”
भय्याजी जोशी यांनी “मुंबईत अनेक राज्यांतील नागरिक राहतात आणि वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे, असं नाही” असं वक्तव्य केलं होतं. या संपूर्ण प्रकरणावरून महाराष्ट्रात मराठी भाषा आणि अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.