“एकनाथ शिंदेंवर दबाव होता, तिकीट मिळू नये म्हणून स्क्रिप्ट..”; शिंदे गटाच्या खासदाराचा गौप्यस्फोट

Bhavana Gawali | लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. महायुतीला केवळ 18 जागा मिळाल्या. तर, महाविकास आघाडीने जवळपास 30 जागा काबिज केल्या. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील फटका बसला. महायुतीकडून काही जागांसाठी तर भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं.

महायुतीच्या अपयशानंतर आता काही नेत्यांनी याबाबत दोष देण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निकालानंतर आता पराभवाची कारणे  शोधली जात आहेत. त्यातच ज्यांना तिकीत देण्यात आलं नाही त्यांची खदखद देखील आता बाहेर येत आहे.

वाशिम लोकसभा मतदारसंघातून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील महाले यांना उमेदवारी देण्यात आली. पण, राजश्री पाटील यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी येथे बाजी मारली. संजय देशमुख 94 हजार 473 इतक्या मोठ्या मताच्या अंतराने विजयी झाले.

भावना गवळी यांचा महायुतीला घरचा आहेर

महायुतीच्या या पराभवानंतर आता विदर्भातील शिंदे गटाच्या माजी खासदार भावना गवळी यांनी मोठा खुलासा केलाय.वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी या तीन टर्मपासून निवडून आल्या. मात्र, यावेळी भावना गवळी यांना पक्षाने तिकीट दिले नाही.यावर आता भावना गवळी यांनी भाष्य करत सूचक विधान केलं आहे.

“एकनाथ शिंदे आणि पक्षावर दबाव होता, तिकीट देऊ नका, त्यासाठी स्क्रिप्ट लिहिली गेली. मात्र, अशा प्रकारच्या स्क्रिप्ट पक्षाच्या हिताच्या नसतात”, असं भावना गवळी म्हणाल्या आहेत. आता त्यांचा रोख नेमका कुणावर होता?, याबाबत आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

“संपूर्ण वाशिम आणि यवतमाळची जनता अनेक वर्षांपासून खासदार म्हणून पाहत आहे. मी काम केलं आणि शिवसेना पक्षाची सक्षमपणे धुरा संभाळत आले. पण यावेळी जे चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं, त्याचाच हा एक भाग आहे. जनतेची जी इच्छा होती, ती इच्छा कदाचित पक्षाच्या वरिष्ठांकडून पूर्ण झाली नाही. जनतेने हे मतांच्या रूपाने दखवलं आहे.”, असं भावना गवळी (Bhavana Gawali ) म्हणाल्या आहेत.

“शिंदे गटाला तिकीट मिळू नये म्हणून स्क्रिप्ट..”

“कधी कधी सत्य हे कटू असतं, पण ते बोललं पाहिजे. मला असं वाटतं की, ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये मी होते. त्यांनी मागिल अनेक वर्षांपासून माझ्यावर विश्वास दाखवला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव होता, असं म्हणायला आता काही हरकत नाही.”, असा गौप्यस्फोट भावना गवळी (Bhavana Gawali )यांनी केलाय.

पुढे त्या म्हणाल्या की, “हेमंत पाटील यांनीही मान्य केलं होतं की, ही स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे. त्यामुळे मलाही असे वाटते की जेव्हा अशा स्क्रिप्ट लिहिल्या जातात, तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात.”, भावना गवळी यांच्या या खुलाश्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. महायुतीमधील अंतर्गत नाराजी आता बाहेर पडत आहे.

News Title –  Bhavana Gawali Big Statement On Eknath Shinde 

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

मोदींच्या सभा फेल!, 18 पैकी 15 उमेदवारांच्या नशिबी आला पराभव

सर्वात मोठी बातमी! निलेश लंकेंच्या पीएवर झाला जीवघेणा हल्ला

निकालानंतर सोन्याचे दर आपटले?; जाणून घ्या नव्या किंमती

सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजितदादांचा मोठा निर्णय; युगेंद्र पवारांना धक्का