Dinesh Lal Yadav Controversy | मराठी विरुद्ध हिंदी वाद पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआ (Dinesh Lal Yadav Nirahua) यांनी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना उघड आव्हान दिलं आहे. “मी मराठी बोलत नाही. आणि मी सर्वांना चॅलेंज देतो – जर तुमच्यात हिंमत असेल तर मला महाराष्ट्राबाहेर काढून दाखवा!” अशा रोखठोक शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे.
यापूर्वी उद्योजक सुशील केडिया यानेही अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. मात्र त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून झालेल्या तीव्र विरोधामुळे त्याने राज ठाकरेची जाहीर माफी मागितली होती. त्या पार्श्वभूमीवर आता दिनेश लाल यादव यांचं वक्तव्य वाद निर्माण करत आहे.
“मराठी बोलत नाही, तरी मी भारतीय आहे” – निरहुआ यांची संतप्त भूमिका :
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे माध्यमांशी बोलताना निरहुआ म्हणाले, “हे देश विविधतेतून एकता दाखवणारा आहे. विविध भाषा आणि संस्कृती आपली ताकद आहेत. कोणी कोणाला भाषेच्या नावावर राज्याबाहेर काढण्याची भाषा करत असेल, तर ते गलिच्छ राजकारण आहे. मी मराठी बोलत नाही, आणि मी उघड आव्हान देतो—जर तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा!” (Dinesh Lal Yadav Controversy)
त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मराठी भाषेचेही कौतुक केले. “मराठी ही फार सुंदर आणि प्रेमळ भाषा आहे, तशीच भोजपुरीसुद्धा आहे. प्रत्येक भाषेचं स्वतःचं सौंदर्य आहे. क्षमता असेल तर सर्व भाषा शिकायला हव्यात,” असं ते म्हणाले.
Dinesh Lal Yadav Controversy | ठाकरे बंधूंना अप्रत्यक्ष टोला, “घाण राजकारण करू नका” :
आपल्या वक्तव्यात निरहुआ यांनी ठाकरे बंधूंना नाव न घेता सूचक टोले लगावत, “राजकारण हे लोकांच्या भल्यासाठी असावं. पण काहीजण ते फक्त तोडण्यासाठी करतात, जोडण्यासाठी नाही. अशी माणसं देशाला तोडतात, जोडत नाहीत,” असंही ठामपणे सांगितलं.
ठाकरे बंधू नुकतेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले आणि “आता एकत्रच राहणार” अशी भावनाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली होती. पण भोजपुरी अभिनेत्याच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उत्तर भारतीय विरुद्ध स्थानिक असा वाद रंगण्याची शक्यता आहे. यामध्ये मनसे काय भूमिका घेते, हे लवकरच स्पष्ट होईल.