अनैतिक संबंधाचा अत्यंत क्रूर शेवट; अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मोठी माहिती समोर

Ashwini Bidre Murder Case

Ashwini Bidre | पोलीस दलातील अधिकारी अश्विनी बिद्रे (Ashwini Bidre) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर (Abhay Kurundkar) यांच्यातील अनैतिक प्रेमसंबंधांची कहाणी केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमध्येच संपली नाही, तर तिने दोन कुटुंबे अक्षरशः उद्ध्वस्त केली. कर्तव्य आणि नैतिकतेची चाड विसरून प्रेमात अंध झालेल्या या दोन विवाहित अधिकाऱ्यांच्या कहाणीचा शेवट अत्यंत क्रूर आणि दुःखद ठरला, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

संबंधांची सुरुवात, वचन आणि वाढता तणाव

अश्विनी राजू गोरे (पूर्वाश्रमीच्या बिद्रे) या २००५ साली स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात दाखल झाल्या होत्या. त्यांचे लग्न हातकणंगले तालुक्यातील आळते येथील मनसेचे उपजिल्हा प्रमुख राजू गोरे (Raju Gore) यांच्याशी झाले होते आणि त्यांना एक मुलगी देखील होती, जिचा सांभाळ आता राजू गोरे करत आहेत. अश्विनी यांची पहिली नियुक्ती पुणे येथे झाली, त्यानंतर त्यांची बदली सांगली (Sangli) येथे झाली. सांगलीतच त्यांची ओळख तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी झाली. कुरुंदकर हे देखील विवाहित असून त्यांना पत्नी आणि दोन मुले होती. ओळखीतून दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. कुरुंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन अश्विनीशी लग्न करण्याचे वचन दिले होते. याच वचनावर विश्वास ठेवून अश्विनी यांनी पती राजू गोरे यांच्यासोबतचे संबंध तोडले होते. कुरुंदकर यांची बदली रत्नागिरी येथे झाल्यानंतरही ते अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत असत.

कालांतराने कुरुंदकरने लग्नास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली, कारण त्याला आपली पहिली पत्नी आणि मुलांना सोडायचे नव्हते. मात्र, अश्विनी यांनी लग्नासाठी तगादा लावला होता, ज्यामुळे दोघांमध्ये रोजच तीव्र भांडणे होऊ लागली. या प्रेमसंबंधाची कुणकुण अश्विनीचे वडील आणि पती राजू गोरे यांनाही लागली होती. प्रकरण वाढत असताना, एका क्षणी कुरुंदकरने अश्विनीच्या पती आणि मुलीला फोनवरून जीवे मारण्याची किंवा बेपत्ता करण्याची धमकीही दिली होती.

हत्येचा कट, तपास आणि निर्णायक पुरावा

अखेरीस, सततच्या कटकटीला आणि लग्नाच्या मागणीला कंटाळून अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्याने आपला बालपणीचा मित्र महेश फळणीकर (Mahesh Phalnikanr) याला या कटात सामील करून घेतले. तसेच, भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा भाचा असलेला पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील (Raju Patil) आणि कुरुंदकरचा कारचालक कुंदन भांडारी (Kundan Bhandari) यांनीही या गुन्ह्यात साथ दिली. ११ एप्रिल २०१६ रोजी, कुरुंदकरने अश्विनीचे अपहरण करून तिला आपल्या मीरा रोड (Mira Road) येथील फ्लॅटवर नेले आणि तिथे तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर महेश फळणीकर आणि राजू पाटील यांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो वसई-भाईंदरच्या खाडीत (Vasai-Bhayandar creek) फेकून देण्यात आला.

अश्विनी यांची हत्या केल्यानंतर त्या जिवंत आहेत असे भासवण्यासाठी, कुरुंदकरने अत्यंत शांत डोक्याने अश्विनी यांच्याच मोबाईलवरून त्यांचे मेहुणे अविनाश गंगापूरे (Avinash Gangapure) यांना एक व्हॉट्सॲप संदेश पाठवला. मानसिक अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी आपण ५ ते ६ महिने उत्तरांचल किंवा हिमाचल प्रदेशात जात आहोत, असे त्या संदेशात म्हटले होते. अश्विनी यांची बदली ठाणे जिल्ह्यातील कळंबोली (Kalamboli) पोलीस ठाण्यात झाली होती, मात्र त्या तिथे हजर झाल्या नाहीत. जुलै २०१६ मध्ये कुटुंबीयांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली, परंतु सुरुवातीला तत्कालीन पोलीस अधिकारी हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेरीस, पती राजू गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) रिट याचिका दाखल केली. २७ ऑक्टोबर २०१६ रोजी न्यायमूर्ती ए. एस. ओक (A S Oka) आणि न्या. ए. ए. सय्यद (A.A. Sayyad) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना (Navi Mumbai Police Commissioner) तात्काळ तपास पथक नेमून अहवाल देण्याचे आदेश दिले. ३१ जानेवारी २०१७ रोजी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये (Kalamboli Police Station) कुरुंदकर विरोधात हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला व नंतर मित्र फळणीकर आणि चालक भांडारी यांनाही अटक करण्यात आली. तपासात कुरुंदकरच्या संगणकातील चॅटिंगमधून संबंध आणि वादाचे पुरावे मिळाले. मात्र, कुरुंदकरला कायद्याच्या कचाट्यात पकडणारा निर्णायक पुरावा ठरला तो म्हणजे व्हॉट्सॲप मेसेजमधील एका अक्षराचा फरक. कुरुंदकरने पाठवलेल्या मेसेजमध्ये ‘How are you?’ मधील ‘You’ साठी इंग्रजी अक्षर ‘Y’ वापरले होते, तर अश्विनी नेहमी ‘U’ वापरत असत. याच एका धाग्यामुळे गुन्हे शाखेने कुरुंदकरच्या मुसक्या आवळल्या.

Title : Big information comes to light in Ashwini Bidre murder case 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .