‘मी कोणाला घाबरत नाही…’ शाईफेकीच्या घटनेनंतर पाटलांची प्रतिक्रया

पुणे | पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. शनिवारी पिंपरी-चिंचवड येथे पाटील एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे.

शाईफेकीच्या घटनेनंतर पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पाटील म्हणाले, मी कार्यक्रमाला निघालो आहे. मी चळवळीतील माणूस आहे. मी कोणाला घाबरत नाही. मी माफी मागितल्यानंतरही हा हल्ला झाला. मी माझं पोलिस संरक्षण काढून कार्यक्रमाला जायला तयार आहे. हिंमत असेल तर समोर या, असं अवाहनही त्यांनी केलं आहे.

अशा घटनांमुळं आपण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तडा देत आहोत. आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु ही झुंडशाही सुरू आहे. पण ही झुंडशाही महाराष्ट्र शासन चालवून घेणार नाही, असंही पाटील म्हणाले.

आज जर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना थोडी सूट दिली असती तर हे केवढ्यात पडलं असतं, पण ही आमची संस्कृती नाही. शब्दाला शब्दानेच टक्कर देता येते,असं मतही पाटलांनी यावेळी व्यक्त केलं.

एका गिरणी कामगाराचा मुलगा या स्टेजपर्यंत आला हे सरंजामशाहीला झेपत नाही, त्यामुळं असे भ्याड हल्ले होत आहेत. उद्यापासून पोलिस संरक्षण माझ्यासोबत नसेल, हिंमत असेल तर समोर या, असंही पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या घटनेचाही निषेध करावा, असं अवाहन मी त्यांना करतो, असंही पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-