‘अटक होऊ शकते म्हणून अजित पवारांनाही घाम फुटला होता’; खळबळजनक दावा समोर

Chhagan Bhujbal | भाजपने ईडीचा धाक दाखवून अनेक पक्ष फोडले असा आरोप विरोधकांकडून अनेकदा करण्यात आला. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन मोठी पक्ष फुटली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी आता भाजपसोबत सत्तेत आहे. अशात पक्षफूटीनंतर अजित पवारांबरोबर गेलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एक अत्यंत मोठा खुलासा केला आहे. ईडीच्या भीतीमुळे आपण भाजपसोबत गेल्याचं भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटलं आहे. या दाव्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाखाली या पुस्तकात अत्यंत गंभीर दावे करण्यात आले आहेत. यात छगन भुजबळ, शरद पवार, अजित पवार, सुनिल तटकरे, अनिल देशमुख यांसह अनेक नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. या पुस्तकात भुजबळ यांनी दिलेल्या मुलाखतीत काय गौप्यस्फोट करण्यात आले होते, ते नमूद करण्यात आलंय.

छगन भुजबळ यांचे मोठे गौप्यस्फोट

काही मीडिया रिपोर्टमध्ये या पुस्तकात केलेले दावे उघड करण्यात आले आहेत. याच मीडिया रिपोर्टनुसार भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितले होते की, “मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या होत्या. मी जर उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. 100 कोटींच्या आरोपांवरून अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. मलाही अशाप्रकारे अडकवण्याचा पुन्हा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे आपण भाजपसोबत गेलो”, असं भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले होते.

ईडीच्या त्रासामुळे सर्वच जण चिंतेत होते. भाजपशी हातमिळवणी केल्याशिवाय आपली सुटका नाही, असं सगळ्यांनाच वाटत होतं. शरद पवारांना हे सर्व काही समजत होते.पण ते भाजपबरोबर जाण्यास तयार नव्हते. नंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ईडीच्या जाचापासून सर्वांचीच सुटका झाली, असं भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले असल्याचं पुस्तकात लिहिण्यात आलंय.

अजित पवार, सुनेत्रा पवार यांनाही ईडीची भीती..

या पुस्तकात भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतही काही दावे केले आहेत. “अजित पवार यांचीही ईडीने चौकशी सुरू केली होती. साखर कारखान्याच्या विक्रीवरून त्यांना घेरलं होतं. कारखान्यात सर्वाधिक भागभांडवल हे अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. कदाचित पत्नीला अटक होऊ शकते, असे अजित पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळेच अजित पवारांनाही घाम फुटला होता.”, असं भुजबळ यांनी म्हटलं असल्याचं या पुस्तकात नमूद करण्यात आलंय.

या सर्व प्रकरणानंतर अजित पवार यांनी लगेच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह शरद पवारांची भेट घेतली होती. यावर तोडगा कसा काढायचा यावर चर्चा झाली. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरु झाली. त्यांच्या इमारतीमधील चार मजले ईडीने जप्त केले. सुनील तटकरे यांचीही ईडी चौकशी करण्यात आली. या तिन्ही नेत्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करू, अशी भूमिका शरद पवारांकडे मांडली होती. मात्र, पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिल्याने अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी भाजपच्या नेत्यांबरोबर वाटाघाटी सुरू केल्या, असा खुलासा भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला असल्याचं पुस्तकात म्हटलं आहे. या पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राज्यभर सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

News Title : Chhagan Bhujbal big claim about Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या –

आजपासून राज्यात पंतप्रधानांच्या कधी व कुठे सभा? पाहा संपूर्ण वेळापत्रक

कोथरूडचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास- चंद्रकांत पाटील

“ED पासून सुटका व्हावी म्हणून भाजपसोबत..”; छगन भुजबळांचा खळबळजनक गौप्यस्फोट

HDFC बँकेने ग्राहकांना दिला झटका! ग्राहकांचे EMI ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार

मनसेसह शिंदे गटाला उद्धव ठाकरेंचा धक्का; तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी बांधलं शिवबंधन