Chhagan Bhujbal | मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात तणाव निर्माण झाला आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा देत काही दिवसांचा अवधी दिलाय. अन्यथा मोठी भूमिका घेणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा मुद्दा गाजत असतानाच सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज (15 जुलै) भेट घेतली आहे.
आज सकाळी सिल्व्हर ओकवर छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यात दीड तास चर्चा झाली. यावेळी भुजबळ यांनी शरद पवार यांच्याकडे राज्यातील परिस्थिती मांडली. राज्यात सध्या स्फोटक परिस्थिती असून तुम्ही ज्येष्ठ नेते या नात्याने ही परिस्थिती शांत करायला हवी, असं आवाहन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलंय.
भुजबळ-पवार भेटीत नेमकं काय घडलं?
या प्रश्नी आपण सर्वांनी चर्चा करायला हवी, वाटलं तर तुम्ही बोलवा आम्ही तुमच्याकडे येतो, असं भुजबळ शरद पवारांना म्हणाले. त्यावर “एक-दोन दिवसांत मीच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतो आणि काय होतंय आणि काय करता येईल, यावर मी चर्चा करायला तयार आहे.”, असं शरद पवार म्हणाले.
यावेळी भुजबळ यांनी सामाजिक प्रश्न माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचं म्हटलं. “मला राजकारणाची किंवा मंत्रीपदाची परवा नाही, मला आमदारकीचीही चिंता नाही. फक्त या राज्यातील जातीवरून वाद आणि हा तणाव संपायला हवा. वेळ पडली तर मी विनंती करायलाही कमी समजणार नाही. सामाजिक प्रश्नांसाठी उद्या जर मला राहुल गांधी यांना भेटावं लागलं तर मी त्यांनाही भेटेले.”, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
छगन भुजबळ यांनी घेतला पुढाकार
यावेळी त्यांनी राज्यातील तणावजनक परिस्थिती शरद पवारांना सांगितली. “महाराष्ट्रात ओबीसी यांना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाचे हॉटेल असले तर, तिथे जात नाही. तर, ओबीसीचे जिथे दुकान असतील त्या ठिकाणी मराठे जात नाहीत. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, राज्यातील ही परिस्थिती आता शांत करायची तुमची जबाबदारी आहे.” असं भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
दरम्यान, महायुती सरकारमधील मंत्री असणारे भुजबळ यांनी स्वतः पुढाकार घेत विरोधी गटाच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेऊन हा मुद्दा मांडल्यानंतर राजकारणात याची जोरदार चर्चा आहे. आता पुढे शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष असेल.
News Title- Chhagan Bhujbal Big Statement
महत्वाच्या बातम्या-
पुणेकरांची चिंता वाढली! झिका व्हायरसनंतर आता ‘या’ रोगाचा शिरकाव
अजित दादांना कसलीही कल्पना न देता भुजबळ थेट शरद पवारांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी
संभाजी राजेंवर गुन्हा दाखल होणार?, मोठी माहिती आली समोर