Ladki Bahin Yojana l महायुती शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यात मोठा प्रभाव टाकला आहे, आणि ही योजना सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. योजनेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांना यातून वगळण्याची प्रक्रिया शासनाने सुरु केली आहे. जेणेकरून योजनेचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचावा.
अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया :
शासनाने योजनेतील लाभार्थी महिलांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत, जवळपास 5 लाख महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकार (Government) अधिक कठोर उपाययोजना करत आहे.
या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ आता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देण्याबाबत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा होऊन, पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी काही नवीन नियम लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लाभाची रक्कम मिळेल. तसेच, लाभार्थी महिला जिवंत आहे की नाही, याचीही पडताळणी केली जाईल. यासाठी दरवर्षी जून ते जुलै या काळात ईकेवायसी (eKYC) करणे बंधनकारक असेल.
Ladki Bahin Yojana l नवीन नियमांद्वारे लाभार्थ्यांची पात्रता निश्चिती :
लाडकी बहीण योजनेच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. तसेच, लाभार्थी हयात असल्याची खात्री करण्यासाठी दरवर्षी जून-जुलैमध्ये ईकेवायसी करणे आवश्यक करण्यात आले आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येईल. प्रत्येक लाभार्थी महिलेच्या बँक खात्याचा तपशील आणि उत्पन्नाच्या नोंदी तपासल्या जातील. अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हास्तरावर पुन्हा तपासणी मोहीम राबविण्यात येईल, जेणेकरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना योजनेतून दूर केले जाईल.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या मोठी आहे. 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार, अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. यामध्ये, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 2,30,000 महिला, 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 1,10,000 महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असलेल्या, तसेच नमोशक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि स्वतःहून योजनेतून नाव काढून घेणाऱ्या 1,60,000 महिलांचा समावेश आहे. अशाप्रकारे, एकूण 5,00,000 महिलांना आतापर्यंत अपात्र ठरवण्यात आले आहे.