काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत दिसले गिरीश बापट, एकच चर्चा सुरु!

मुंबई | आगामी निवडणुका एकत्र लढवण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काल पहिली बैठक पार पडली, मात्र या बैठकीवेळी भाजपचे मंत्री गिरीश बापट यांनी त्याठिकाणी हजेरी लावल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु होती. त्यावेळी बापट अचानक त्याठिकाणी अवतरले. त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेटही घेतली.

दरम्यान, आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आपण त्याठिकाणी गेलो होतो. माझ्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका, असं गिरीश बापट यांनी म्हटलंय. मात्र या प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा आहे.