Eknath Shinde l महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा मोठी उलथापालथ झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश सुरू असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठा डाव टाकत काँग्रेसला जबर धक्का दिला आहे. गोंदियातील काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे (Sahsaram Korote) यांनी शिवसेनेत (Shinde गट) प्रवेश केला असून, त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सरपंचांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.
“ऑपरेशन टायगर”मधून काँग्रेसला धक्का! :
कोकणात “ऑपरेशन टायगर” सुरू असताना आता त्याचा फटका विदर्भातील काँग्रेसला बसला आहे. गोंदियातील देवरी येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला, आणि त्याच वेळी सहसराम कोरोटे यांनी अधिकृतरित्या शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते. सहसराम कोरोटे यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा ठेवली होती. मात्र, काँग्रेसने त्यांना डावलले आणि त्यामुळे ते नाराज होते. अखेर तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर तीव्र आरोप केले होते.”नाना पटोलेंनी माझं तिकीट सूडभावनेतून कापलं, त्यामुळे काँग्रेसला रामराम करत आहे,” असे कोरोटे यांनी स्पष्ट केले.
कोरोटे यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे काँग्रेससाठी गोंदियात मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतींचे सरपंचही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये मोठा फटका बसू शकतो. कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना इशारा दिला.
“मला हलक्यात घेऊ नका! ज्यांनी मला हलक्यात घेतलं आहे, त्यांना मी आधीच सांगितलं आहे. मी एक साधा कार्यकर्ता आहे, पण मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. प्रत्येकाने मला त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे,” असे शिंदे म्हणाले.
Eknath Shinde l महायुतीत वादाची चिन्हे? :
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, असे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात वॉकयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिंदेंनी नुकतेच ‘टांगा पलटी’ विधान केलं होतं, त्याचा पुनरुच्चार केल्याने चर्चांना आणखी उधाण आलं आहे.