Water Supply l आकुर्डी (Akurdi) येथील खंडोबा माळ परिसरातील टाकीला जोडणारी पाण्याची वाहिनी फुटल्याने मंगळवारी (दि. २६) हजारो लिटर पाणी वाया गेले. तसेच, या भागांमध्ये बुधवारी (दि. २७) गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दोन दिवस पाणीपुरवठ्यात अडचणी
मंगळवारी जलवाहिनी फुटल्यामुळे, सायंकाळच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. पाणीपुरवठा विस्कळीत झाला आणि नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. बुधवारी तर गढूळ पाणी आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
आकुर्डी गावठाण आणि आसपासच्या परिसरात गढूळ पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी पाणी वापरणे टाळले. काही नागरिकांनी नाइलाजाने पाणी उकळून पिण्यासाठी वापरले. दूषित पाण्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीवरील व्हॉल्व खराब झाल्याने नागरिकांना गढूळ पाणीपुरवठा झाला, असे पाणीपुरवठा अधिकारी तनुजा व्यवहारे (Tanuja Vyavahare) यांनी सांगितले. व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली असून, गढूळ पाण्यामुळे झालेल्या टाकीची स्वच्छता करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
Water Supply l तातडीने कार्यवाहीची मागणी
आरोग्याची गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता, पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.