रक्तदाब वाढल्यास घाबरून जाऊ नका, हे घरगुती उपाय करून पाहा

Blood Pressure | मधुमेहाप्रमाणेच उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन (Hypertension) हा एक जीवघेणा आजार बनत चालला आहे. पूर्वी फक्त वृद्ध किंवा मध्यमवयीन व्यक्तींना होणारा उच्च रक्तदाबाचा त्रास आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ताणतणाव, अपुरी किंवा अवेळी झोप, अति मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे तसेच व्यायामाचा अभाव ही उच्च रक्तदाबाची मुख्य कारणे मानली जातात. उच्च रक्तदाबाने आजवर अनेक महाविद्यालयीन तरुणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. उच्च रक्तदाबाच्या त्रासावर बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु त्यांचे दुष्परिणाम देखील आहेत. या लेखात आपण काही घरगुती उपाय आणि पदार्थांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होईल. ( Blood Pressure)

आपले हृदय धमन्यांद्वारे संपूर्ण शरीरात रक्त पोहोचवते. सर्व अवयवांचे कार्य सुरळीत चालण्यासाठी ठराविक दाबाने रक्तप्रवाह होणे गरजेचे असते. जेव्हा रक्तवाहिन्यांमधील दाब वाढतो, तेव्हा त्याचा परिणाम रक्ताभिसरणावर होतो आणि उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. जेव्हा हाच दाब कमी होतो, तेव्हा कमी रक्तदाब म्हणजेच लो-बीपीचा (Low-BP) त्रास सुरू होतो.

उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी घरगुती उपाय

१) लसूण (Garlic): काही आहारतज्ञ यांच्या मते, उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण हे सर्वोत्तम आहे. अनेकांना लसूण चावून खायला आवडते. लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील नायट्रिक ऍसिडचे (Nitric Acid) प्रमाण वाढते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या लसणाच्या पाकळ्या खाणे फायदेशीर ठरू शकते.

२) बदाम (Almonds): बदाम आरोग्यासाठी लाभदायी मानले जातात. बदामात पोटॅशियम (Potassium), मॅग्नेशियम (Magnesium) आणि फायबर्स (Fibers) मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि पर्यायाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

३) फळे (Fruits): स्ट्रॉबेरी (Strawberry), ब्लूबेरी (Blueberry), रासबेरी (Raspberry) आणि ब्लॅकबेरी (Blackberry) मध्ये फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून आराम मिळतो. याव्यतिरिक्त, केळी (Banana) आणि किवी (Kiwi) च्या सेवनाने देखील उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. (Blood Pressure)

४) ग्रीक योगर्ट (Greek Yogurt): आहारतज्ञांच्या मते, ग्रीक योगर्ट हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. त्यातील कॅल्शियम (Calcium), पोटॅशियम आणि इतर खनिजे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

५) हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables): हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेल्या विविध पोषकतत्त्वांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. या भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या नायट्रेट्समुळे (Nitrates) रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

६) ओट्स (Oats): वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ओट्स खाणे फायदेशीर आहे. याशिवाय, ओट्स खाल्ल्याने रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. ओट्समध्ये असलेले बीटा ग्लुकेन (Beta Glucan) आणि फायबर उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. (Blood Pressure)

Title : Control Your Blood Pressure Naturally