Santosh Deshmukh Murder l बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येनंतर आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी तसेच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर खंडणी आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, या मागण्यांसाठी लातूरमध्ये आंदोलन छेडण्यात आले.
संतप्त मराठा समाजाच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच जोरदार घोषणाबाजी करत “केवळ राजीनामा पुरेसा नाही, धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी करा” अशी मागणी केली.
बीड जिल्हा बंद, केजमध्ये तणावाचे वातावरण :
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धक्कादायक फोटोज आणि दोषारोपपत्रातील माहिती समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली. अकरा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र, केज शहरात बंदला हिंसक वळण लागले. काही आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदवला.
तसेच, “धनंजय मुंडेंना या प्रकरणात सहआरोपी करा” अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Santosh Deshmukh Murder l उद्या धाराशिव बंदची हाक :
धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मराठा समाजाने उद्या (5 मार्च) धाराशिव बंदची हाक दिली आहे.
सकल मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली हा बंद पुकारण्यात आला असून, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.