बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर घणाघात

मुंबई | उद्यापासून महाराष्ट्रातील अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. अधिवेशनात जर आम्हाला आमचे मुद्दे मांडता येत नसतील तर आम्ही जनतेच्या फोरममध्ये आमचे प्रश्न मांडू, असा इशाराच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, सोमवारी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशन हे या वेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यावरून विरोधी पक्षाने राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी करून कोणतेही संसदीय आयुधे वापरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे सदस्यांनी 35 दिवस टाकलेले त्यांचे प्रश्न व्यापगत होणार आहेत. यापूर्वी अधिवेशनाचा कालावधी जरी कमी केला असला तरी प्रश्नांची उत्तरं मिळत होती.

आता पावसाळी अधिवेशनातील प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत मग प्रशासकीय अधिकारी काय माशा मारायला आहेत का?, असा प्रश्न माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला उद्देशून विचारला आहे. तसेच प्रश्न विचारायला कोणी नाही म्हणून अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायला या सरकारने रान मोकळं करून दिलं आहे, असा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे.

सभागृहात आम्हाला आमचे प्रश्न मांडता येत नसतील तर आम्ही माध्यमांसमोर येऊन प्रश्‍न मांडू, रस्त्यावर उतरून आंदोलन करु, पुन्हा सरकारने आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय म्हणून बोलू नये, राज्य सरकारचा भ्रष्टाचार विरोधी पक्ष म्हणून आम्ही चव्हाट्यावर आणू, या भीतीने सरकारने या अधिवेशनातून पळ काढण्याचा निर्णय घेतला असल्याचा घणाघात राज्य सरकारवर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More