Dhananjay Deshmukh l मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येची छायाचित्रे समाजमाध्यमांवर फिरत असून, या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपासून हा विषय गाजत असताना आता धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेत मोठी मागणी केली आहे.
आरोपींना भर चौकात सोडून समाजाने शिक्षा द्यावी :
धनंजय देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत आरोपींविरोधात संताप व्यक्त केला आहे. “हे गुन्हेगार केवळ खूनच करत नाहीत, तर खंडणी वसूल करतात, चोरी करतात. ते आधीपासूनच समाजविघातक प्रवृत्तीचे आहेत. संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली, ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. मी त्यांचा रक्ताचा भाऊ असल्याने माझ्या वेदना अधिक तीव्र आहेत,” असे ते म्हणाले.
या हत्येच्या छायाचित्रांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेदना झाल्या आहेत. त्यामुळे आरोपींना भर चौकात सोडावे, त्यांना जात-पात, धर्म काहीच नाही, समाजानेच त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Dhananjay Deshmukh l हत्येचे सूत्रधार कोण? मोठा सवाल :
मात्र या हत्येमागे कोणाचा हात आहे, याचे उत्तर अजून मिळालेले नाही. धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात मोठा आरोप करत, “हे कृत्य आरोपींनी स्वतःच्या इच्छेने केलेले नाही, त्यांच्या मागे कोणी तरी मोठे सूत्रधार आहेत. या हत्या करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण कुणी दिले? यापूर्वी देखील त्यांनी असे प्रकार केले आहेत, मात्र कोणत्याही पीडिताने आवाज उठवला नाही. या गुन्हेगारांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत, अनेक निराधार मुलांना अनाथ केले आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सरकारला आवाहन करत सांगितले की, “आरोपींना केवळ तुरुंगात टाकून उपयोग नाही, त्यांना वेगळी आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे. सरकारने यावर त्वरित विचार करून ठोस निर्णय घ्यावा. हे आरोपी माणूस नाहीत, सैतान आहेत. इतकेच नव्हे, तर मृतदेहाचीही विटंबना करण्यात आली आहे,” असेही त्यांनी सांगितले.