Dhananjay Deshmukh | मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी, त्यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी तीव्र भावना व्यक्त करत, या प्रकरणातील एकही आरोपी सुटला, तर कुटुंबीय टोकाचे पाऊल उचलतील, असा इशारा दिला आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली असून, सीआयडी (CID), एसआयटी (SIT) मार्फत चौकशी सुरू आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही सुरू आहे. असे असताना, आरोपी सुटण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने, देशमुख कुटुंबीयांनी हा इशारा दिला आहे.
धनंजय देशमुखांचा गंभीर इशारा
धनंजय देशमुख यांनी सांगितले की, “या हत्या प्रकरणाचे सर्व पुरावे पोलीस आणि तपास यंत्रणांकडे आहेत. त्यामुळे, कोणत्याही आरोपीने दगाफटका करण्याचा प्रयत्न करू नये. आष्टीचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली असली, तरी आमचा तपास यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे.”
“कृष्णा आंधळे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही, तो दोन वर्षे केजमध्ये उघडपणे फिरत होता. पोलिसांनी त्याला वेळीच अटक केली असती, तर ही घटना घडली नसती. त्यामुळे कृष्णाला अभय देणाऱ्यांची चौकशी करून, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.
“त्याला शासन जबाबदार राहील”
या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आरोपींना वाचवण्यासाठी कोणीही प्रयत्न करू नये, अन्यथा आम्ही टोकाचे पाऊल उचलू आणि त्याला शासन जबाबदार राहील, असेही त्यांनी (Dhananjay Deshmukh) म्हटले आहे.
News Title : Dhananjay Deshmukh Warning to govt