मुंबई | राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना बेल्स पाल्सी (Bell’s Palsy) या आजाराचे निदान झाले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा आजार झाल्याने त्यांच्या चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम झाला असून, सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नसल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटद्वारे दिली आहे.
डोळ्यांवर शस्त्रक्रियेनंतर बेल्स पाल्सीचे निदान
धनंजय मुंडे यांनी 15 दिवसांपूर्वी दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया (Eye Surgery) करून घेतली होती. ही शस्त्रक्रिया पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने (Dr. T.P. Lahane) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. डॉक्टरांनी त्यांना दहा दिवस सूर्यप्रकाश, धूळ आणि उजेडापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याच दरम्यान त्यांना बेल्स पाल्सीचा त्रास जाणवू लागला आणि त्याचे निदान झाले.
धनंजय मुंडे यांच्यावर सध्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये (Reliance Hospital) प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. अरुण शहा (Dr. Arun Shah) यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. हा आजार झाल्याने त्यांना सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही, त्यामुळेच काही महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकींसह पक्षाच्या ‘जनता दरबार’ कार्यक्रमालाही उपस्थित राहता आले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना त्यांनी आधीच माहिती दिली आहे. मात्र, लवकरच या आजारावर मात करून पुन्हा जनसेवेत रुजू होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बेल्स पाल्सी म्हणजे काय?
बेल्स पाल्सी हा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम करणारा न्युरोलॉजिकल विकार आहे. यात चेहऱ्याची एक बाजू अचानक अशक्त होते किंवा तात्पुरता लकवा (Paralysis) येतो. बहुतेक प्रकरणांमध्ये हा त्रास काही आठवड्यांत दूर होतो, मात्र उपचार गरजेचे असतात.
धनंजय मुंडे यांच्यावर सध्या राजकीय आणि कायदेशीर दबावही मोठ्या प्रमाणावर आहे. मस्साजोग प्रकरण, मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर न झालेल्या प्रस्तावांचे टेंडर काढल्याचे आरोप, तसेच अंजली दमानिया आणि करूणा शर्मा यांचे आरोप यामुळे ते चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत त्यांची प्रकृती बिघडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.