Dhananjay Munde | अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी काही केल्या संपताना दिसत नाहीत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण, परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde) हत्या प्रकरण, तसेच कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप यामुळे मुंडे अडचणीत सापडले आहेत.
सरपंच आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशय
धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड (Walmik Karad) सोबत असलेले घनिष्ठ संबंध पाहता, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं जात आहे. तसेच, परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणातही त्यांचे नाव घेतले जात आहे. या प्रकरणात मुंडे समर्थकांवरही संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. याशिवाय, धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना अंशतः दोषी ठरवले आहे.
अटक वॉरंटची शक्यता?
या प्रकरणांमध्ये अडकलेल्या धनंजय मुंडेंना आणखी एका खटल्याचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना खरी माहिती लपविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
करुणा मुंडे यांनी या प्रकरणात अलीकडेच ऑनलाइन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने परळी फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला. आज या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, जर धनंजय मुंडे आज न्यायालयात हजर राहिले नाहीत, तर त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी होऊ शकते.
राजकीय भवितव्य धोक्यात?
या सततच्या खटल्यांमुळे धनंजय मुंडे यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. महायुती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत, मात्र या आरोपांमुळे त्यांना राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते.
Title : Dhananjay Munde Faces Multiple Legal Battles Arrest Warrant Possible