Anjali Damania l संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणानंतर अखेर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला, तरी या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील प्रश्न उपस्थित करत, “मुंडेंना राजकारणातून हाकलून का दिले नाही?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
“राजीनामा नव्हे, बडतर्फी हवी होती” :
अंजली दमानिया म्हणाल्या, “धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला? त्यांना उचलून बाहेर का फेकलं नाही? ते बडतर्फ होणे आवश्यक होते. मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन आपण काय साध्य केले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना थेट राजकारणातून हाकलायला हवं होतं.”
त्यांनी संताप व्यक्त करत पुढे सांगितले, “वाल्मिक कराडसारखी माणसं सामान्य नागरिकांना चिरडून टाकतात आणि हे राजकारणी त्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देतात. हे सगळे यात गुंतलेले आहेत. कारण सर्व पैसा याच राजकारण्यांकडे जात होता. राजीनामा घेण्यासाठी बैठका घेण्याची गरज काय? हे राजकारण कोणत्या स्तरावर गेलं आहे!”
“मुख्यमंत्र्यांना या फोटो-व्हिडिओंची माहिती होती” :
दमानिया यांनी स्पष्टपणे सांगितले की, “मुख्यमंत्री म्हणतात त्यांना माहिती नव्हती, पण मला कित्येक लोकांचे संदेश आले. त्या फोटोमुळे लोकांना झोप लागत नव्हती. संवेदनशील माणसाला ते पाहून वेदना होतील, पण आपल्या राजकारण्यांना आता भावना उरल्याच नाहीत. हे बैठक घेतात, चर्चा करतात आणि ठरवतात की राजीनामा घ्यायचा की नाही. हे किती हास्यास्पद आहे!”
काल देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यात बैठक झाली. यावेळी मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला आहे..