Walmik Karad Encountered l बीड जिल्ह्यातील राजकारण आणि गुन्हेगारीचे संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. कासले यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी वाल्मिक कराड (walmik karad) याचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला होता.
एका नव्याने व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणजीत कासले म्हणतात, “वाल्मिक कराड मुंडेंचे अंडी-पिल्ली बाहेर काढणार होते, त्यामुळे त्यांचा एन्काऊंटर करण्याची योजना होती.” या दाव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुरावे दाबल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याचाही उल्लेख :
कासले यांनी यावेळी सांगितले की, संतोष देशमुख प्रकरणातील अनेक पुरावे दाबले गेले आणि त्यामुळेच धनंजय मुंडे (dhananjay munde) यांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांचा पाठिंबा असल्याने ते सहआरोपी ठरणार नाहीत. “महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं,” असं आव्हानही त्यांनी दिलं.
Walmik Karad Encountered l एन्काऊंटरसाठी कोटींच्या ऑफर्सचा दावा :
कासले पुढे म्हणाले, “मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच, दहा आणि पन्नास कोटींच्या ऑफर्स देण्यात आल्या. मी सायबर विभागात होतो, त्यांना माहित होतं की मी हे करु शकतो. पण मी माझा मोठेपणा सांगत नाही.”
या सगळ्या प्रकरणात कासले यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, “माझा कोणत्याही समाजाला दुखावण्याचा हेतू नव्हता. जर काही आक्षेपार्ह बोललो गेलं असेल, तर मी त्याबद्दल माफी मागतो.”
बीडचे वातावरण तापले, राजकीय भूकंप? :
सध्या सोशल मीडियावर कासले यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यांच्या आरोपामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. प्रशासन आणि राजकीय वर्तुळांतही या प्रकरणाची तीव्र चर्चा सुरु झाली आहे.